चोराच्या हिप्नोटाईज कांडमुळे सगळं उद्ध्वस्त, काही समजायचा आत महिलेसोबत धक्कादायक घडलं!
भोर तालुक्यात एक धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेला थेट हिप्नोटाईज करून तिच्याजवळ मोठी लूट करण्यात आलीय.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 65वर्षीय महिलेला हिप्नोटाईज करून तिच्याजवळचे साधारण तीन लाखांचे सोने लुटण्यात आले आहे. चोराने थेट हिप्नोटाईज करून महिलेच्या अंगावरचे दागिने चोरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कमल शिवाजी रेणुसे (रा. नसरापूर) असे लूट झालेल्या महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार कमल शिवाजी रेणुसे या सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे त्यांच्या हरदेव हॉटेलकडे जात होत्या. हॉटेलकडे जाण्याआधी त्या नेहहमी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी जायच्या. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्या आजदेखील स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी थांबल्या. दर्शन घेतल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे त्यांच्या हॉटेलच्या दिशेनेन निघाल्या. मात्र हीच संधी साधत एक अज्ञात मास्कधारी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली.त्यानेच नंतर हिप्नोटाईजच्या माध्यमातून कमल रेणुसे यांच्या अंगावरील दागिने लुटले.
हिप्नोटाईज नेमकं कसं केलं?
कमल रेणुसे या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्ती स्वतःला मी मंदिरात जात नाही असं सांगितलं. तसेच या मंदिरात माझ्यातर्फे 900 रुपये दान करा अशी विनंती केली. पुढे कमल रेणूसे यांना विश्वासात घेऊन दुचाकीवर बसवले आणि बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराकडे घेऊन गेला. तिथे कथितरीत्या हिप्नॉटिझम करून कमल रेणुसे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण, हातातील अंगठी असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शक्यतो चोर रात्रीच्या अंधारात चोरी करतात. कोणीही आजूबाजूला नसताना या चोऱ्या केल्या जातात. एखादा अट्टल चोरही गर्दी बघून चोरी करणं टाळतो. कारण एकदा तावडीत सापडलं तर लोक चोप देतील याची भीती चोरांना असते. मात्र या मास्कधारी अजब चोराने थेट हिप्नोटाईज करून महिलेचे लाखोंचे सोने लुटले आहे त्यामुळे या घटनेने नसरापूरमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या चोराचा आणि पीडित महिला त्याच्या गाडीवर बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे.
आरोपीचा शोध सुरू
दरम्यान, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या सूचनेनुसार हवालदार अजित माने यांनी घटनास्थळाची पाहणी करत ग्रामपंचायतच्या सीसीटीव्हींची तपासणी केली आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना तपासात मदत करत असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
