Pune Crime : धक्कादायक, पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार
Pune Crime : सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली.

पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गुन्हा खूपच भयानक आहे. पुण्यात नेहमीच वदर्ळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती, त्यावेळी ही घटना घडली. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख ही पटली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पीडित तरुणी पुण्याहून फलटणला चालेलली. ती पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याच सांगितलं. आरोपीने तरुणीच्या एकटं असण्याचा फायदा उचलला. तो तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं. तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला. त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला व तिथून पसार झाला.
उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल
या सर्व भयानक अनुभवानंतर तरुणी फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने आपल्या एका परिचिताला फोन करुन हा सर्व प्रकार सांगितला. त्याच्या सल्ल्यानुसार तिने स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून सगळा घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. पीडित तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
