Rekha Jare Murder | साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा, ‘त्या’ तिघांनी तोंड उघडलं नि बाळ बोठे हैदराबादमध्ये सापडला

बाळ बोठेच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन केली. (Rekha Jare Mastermind Bal Bothe found)

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 12:38 PM, 13 Mar 2021
Rekha Jare Murder | साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा, 'त्या' तिघांनी तोंड उघडलं नि बाळ बोठे हैदराबादमध्ये सापडला
आरोपी बाळ बोठे आणि रेखा जरे

अहमदनगर : ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैदराबादमध्ये बाळ बोठेला ताब्यात घेऊन पोलिस पथक नगरकडे रवाना झाले. त्याला मदत करणाऱ्या पाच जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Rekha Jare Murder Case How Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)

बाळ बोठे कसा सापडला?

अहमदनगर पोलिस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांच्या पथकाने ही कारवाई केली. रेखा जरे यांच्या हत्येनंतर साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही तो पोलिसांना सापडत नव्हता. शेवटी हैदराबाद शहरात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

‘त्या’ तिघांच्या माहितीवरुन बाळ बोठेचा माग

पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन केली. हैदाराबादमध्ये बाळ बोठे जिथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्या भागात ही पथकं पाठवण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला.

हॉटेल रुमला बाहेरुन कुलूप

हैदराबादमधील एका हॉटेलमधून बाळ बोठेला अटक केली. इतकंच नाही तर बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांनाही पोलिसांनी जेरबंद केलं. विशेष म्हणजे ज्या रुममध्ये बाळ बोठे होता, त्या रुमला बाहेरुन कुलूप लावण्यात आलं होतं. अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केलं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत कौतुक होत आहे.

काय होती घटना?

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेला रेखा जरे यांच मुलगा रुणाल जरे याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला होता.

बाळ बोठेचा साडेतीन महिन्यांपासून गुंगारा

रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे साडेतीन महिने पोलिसांना गुंगारा देत होता. बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बाळ बोठेविरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेवर पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.

कोण आहे बाळ बोठे?

बाळ बोठे शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन करत होता. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला. (Rekha Jare Murder Case How Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)

हनी ट्रॅप आणि समझोता

गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. मात्र ही नावे छापताना त्या व्यक्तीचे नाव कोडमध्ये छापले जायचे, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल आणि नंतर समझोता करता येईल. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की, यासंदर्भात बोठे याला याची माहिती कशी मिळत होती आणि यासंदर्भातील ते मालिका कसे छापत होते, त्यांचा तर या हत्याकांडात काही संबंध नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

संबंधित बातम्या :

कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?

रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैदराबादमध्ये बेड्या

(Rekha Jare Murder Case How Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)