हातात कोयता, अंगावर अर्धे कपडे, अनवाणी पाय! धावत्या बसमध्ये तरुणावर हल्ला करणाऱ्याला कसं पकडलं? थरकाप उडवणारी घटना
बारामतीहून इंदापूरला जाणारी इंदापूर आगाराची एसटी बस काटेवाडी परिसरात पोहोचली असताना ही घटना घडली. मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने अचानाक बॅगेतून कोयता काढून हल्ला केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून जात होता. तेवढ्यात पोलिसांनी त्याला कसे पकडले जाणून घ्या...

बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आता समोर आला असून, पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता आरोपीला नेमकं कसं ताब्यात घेतलं जाणून घ्या…
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी बारामतीहून इंदापूरला जाणारी इंदापूर आगाराची एसटी बस काटेवाडी परिसरात पोहोचली असताना ही घटना घडली. बस मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणावर बाजूला बसलेल्या आरोपीने अचानक बॅगेतून कोयता काढून सपासप वार केले. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला. खचाखच भरलेल्या बसमध्ये अशा प्रकारचा हल्ला झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
वाचा: कोणता साप जास्त विषारी, अंडी देणारा की पिल्लांना जन्म देणारा?
आरोपीचं स्वत:वर हल्ल्याचा प्रयत्न
हल्लेखोर तरुणाने केवळ पीडित तरुणावरच हल्ला केला नाही, तर त्याने त्याच कोयत्याने स्वत:च्या गळ्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसमधील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्याला थांबवलं. हल्ल्यात जखमी झालेला तरुण काटेवाडी येथे बसमधून उतरला आणि जखमी अवस्थेत तिथून निघून गेला.
पोलिसांची कारवाई
हल्ला केल्यानंतर आरोपी तरुण अनवाणी पायाने, अर्धवट कपड्यांमध्ये आणि हातात कोयता घेऊन बसमधून उतरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतलं. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हल्ल्यामागचं कारण काय?
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्याने हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तपास करत आहेत.
