अडीच वर्षांचा चिमुकला, अचानक व्हायला लागला त्रास, समोर आलं धक्कादायक सत्य, डान्स टिचरने…
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अडीच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाला आहे.

Thane Crime News : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरने हे दुष्कृत्य केलंय. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर ठाणे जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय चिमुकल्याला त्याच्या पालकांनी पाठवलं होतं. या चिमुकल्यावर 15 मे आणि 21 मे अशा दोन वेळा तिथे डान्स टीचर म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र दुलानी या नराधमाने लैंगिक अत्याचार केले.
त्रास होत असल्याचं पालकांना सांगितलं अन्…
यानंतर मुलाला त्रास होऊ लागल्याने पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं. त्यामुळे हादरलेल्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठत नराधम जितेंद्र दुलानी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तातडीने या नराधमाला बेड्या ठोकल्या.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आणखी काही प्रकरणं समोर येणार का?
दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. आम्ही आमच्या मुलांना कुठे पाठवावे की नाही? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. तसेच या प्रकरणातील डान्स टिचरवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. डान्स टिचरला दिलेल्या पाच दिवसांच्या कोठडीच्या काळात पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे त्याने याआधीही असे कुकृत्य केले होते का, याचा तपास केला जाणार आहे.
