संतोष देशमुख मर्डर केसमध्ये सर्वात मोठी अपडेट; कृष्णा आंधळे फरार घोषित
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख मर्डर केसमध्ये सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख मर्डर केसमध्ये सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. सीआयडी आणि एसआयटीचं पथक अजूनही त्याच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. तर, दुसरीकडे खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुख मर्डर प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार आदींवर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे.
संतोष देशमुख मर्डर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते. पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. आता त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.
फरार घोषित कधी करतात?
जेव्हा कोर्टाकडून एखाद्या व्यक्तीला अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जातं, त्यानंतरही अनेकदा नोटीस बजावूनही ती व्यक्ती कोर्ट किंवा पोलिसांसमोर शरणागती पत्करत नाही, तेव्हा सीआरपीसीच्या कलम 82 अन्वये त्याला फरार घोषित केलं जातं. सामान्य भाषेत त्याला तडीपारही म्हटलं जातं. पण कायद्याच्या भाषेत त्याला फरार म्हटलं जातं. फरार घोषित केल्यानंतर आरोपीला 30 दिवसाच्या आत कोर्टात अपील करावी लागते. जर त्याने अपील करायला उशीर केला तर त्याला उशीर का झाला याचं कारणही द्यावं लागतं.
पंढरपुरात मोर्चा
दरम्यान, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यावा या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चात सामील झालं आहे. धनंजय देशमुख, वैभवी आणि विराज देशमुख मोर्चात सहभागी आहेत. आम्ही विठुरायाच्या नगरीतील जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो आहे. सगळ्यांना आवाहन करतोय मोर्चा शांततेत पार पाडावा, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.