रेल्वे ट्रॅकवर इन्स्टा रिल्स बनवत होते, अचानक भरधाव ट्रेन आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं
मृत्यूच्या 15 मिनिटांपूर्वी दोघा मयत मित्रांनी रेल्वे ट्रॅकवर केलेल्या दोन रिल्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या होत्या. तिसरी रिल्स बनवत असतानाच हा अपघात घडला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

खगडिया : रेल्वे ट्रॅकवर इन्स्टा रिल्स बनवणे तिघा मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. रिल्सचे शूट करत असतानाच अचानक मागून भरधाव ट्रेन आली अन् दोन मित्रांना चिरडत निघून गेली. तर मोबाईल शूट करत असलेल्या तिसऱ्या मित्राने पुलावरुन उडी घेतल्याने तो बचावला आहे. मात्र तो गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हल्ली सोशल मीडियावर रिल्स बनवणे आणि लाईक्स मिळवणे हे तरुणांच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भागच जणू बनले आहे.
नववर्षानिमित्त मंदिरात दर्शनाला चालले होते तिघे
नवीन वर्षानिमित्त तीन अल्पवयीन मित्र मंदिरात दर्शन घेण्यासाठी घरुन गेले होते. तिघेही मानसी प्रखंडच्या बलहा येथून धमारा घाट मंदिर येथे चालले होते. यावेळी ते मानसी-सहरसा रेल्वे मार्गावरील धमारा घाट स्थानकाजवळ पोहचताच तिघांनी रेल्वेट्रॅकवर उभे राहून इन्स्टा रिल्स बनवायला सुरवात केली.
रिल्स शूट करत असतानाच मागून ट्रेन आली
रिल्सची शुटिंग करत असतानाच अचानक मागून जानकी एक्स्प्रेस आली. यावेळी दोघांची ट्रेनकडे पाठ असल्याने त्यांना काही कळायच्या आत ट्रेनने चिरडले. तर शुटिंग करत असलेल्या तिसऱ्या मित्राने पुलावरुन उडी घेतल्याने तो बचावला. मात्र गंभीर जखमी झाला आहे.
मृत्यूपूर्वी दोन रिल्स पोस्ट केल्या
मृत्यूच्या 15 मिनिटांपूर्वी दोघा मयत मित्रांनी रेल्वे ट्रॅकवर केलेल्या दोन रिल्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या होत्या. तिसरी रिल्स बनवत असतानाच हा अपघात घडला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मृत्यूपूर्वी पोस्ट केलेले दोन्ही व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
