Mahesh Gaikwad : वैभव गायकवाड तिथे दिसतोय, मग त्याला क्लीन चीट कशी? महेश गायकवाड यांचा सवाल
Mahesh Gaikwad : तत्कालिन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच 6 राऊंड फायर केले होते. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं.

वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता. तत्कालिन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच 6 राऊंड फायर केले होते. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. एका आमदाराच्या अशा वर्तनाने सगळा महाराष्ट्र हादरला होता. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहेत. पण आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागलं आहे.
गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लिन चीट देण्यात आली आहे. उल्हासनगर कोर्टात या प्रकरणी पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आरोपपत्रात फक्त दोन आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. नागेश बडेराव आणि कुणाल पाटील. वैभव गायकवाडच नाव आरोपपत्रात नाहीय. त्यावर आता महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया आली आहे. “पूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी घटनास्थळी वैभव गायकवाड होता. वैभव गायकवाड यांनी गणपत गायकवाडला बोलवण्याचे काम केले. त्यांनी नियोजन केले आणि गुंड या ठिकाणी बोलवले” असं महेश गायकवाड म्हणाले.
‘छोट्या मोठ्या गुन्ह्यात मोक्का सारखा कायदा लावला जातो’
“हल्ल्यात स्पष्ट दिसतं आहे, गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित आहे. दोघे एकमेकांना इशारा करत होते. माझ्यापाठी राजकीय व्यक्ती नाही. राजकीय दबावामुळे पोलिसांनी या गोष्टी केलेल्या आहेत” असं महेश गायकवाड म्हणाले. “छोट्या मोठ्या गुन्ह्यात मोक्का सारखा कायदा लावला जातो. या घटनेत कुठलाच प्रयत्न केला नाही. राजकीय दबावाखाली या सर्व गोष्टी घडत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही” असं महेश गायकवाड म्हणाले.
‘….आणि पुढची रणनिती ठरवणार’
“सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळ्या गोष्टी असताना आरोपीला क्लीन चिट देणे यामध्ये मोठा राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय होऊ शकत नाही. माहितीच्या अधिकारात माहिती तसेच वर्षभर मी पत्रव्यवहार करत होतो. या लोकांचे रिवॉल्वर लायसन, फरार घोषित करणं व संपत्ती जप्त करणे या प्रोसेससाठी पत्रव्यवहार करत होतो. मात्र मला कुठेही माहिती मिळत नव्हती. राजकीय हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून हे सगळं घडवून आणलं. आता उच्च न्यायालयाकडे मी दाद मागणार. वकिलाचा सल्ला घेऊन वरच्या कोर्टात जाणार आणि पुढची रणनिती ठरवणार” असं महेश गायकवाड म्हणाले.
‘चार्जशीट मिळाली नाही’
“चार्जशीट मिळाली नाही. आता ती आम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये सर्व पॉइंट कळतील. चार्जशीट कशा पद्धतीने बनवली आहे. कशा प्रकारे क्लीन चिट देण्याचं काम केलेलं आहे, हे सगळे चार्टशीट आल्यानंतर माहिती करू” असं महेश गायकवाड यांनी सांगितलं.
