स्त्री भुताने अमरावतीला पछाडलं? तरुणासोबत भयंकर घडलं? नेमकं सत्य काय
स्त्री भुताने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा दावा केला जातोय. हा दावा करताना काही फोटो आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत.

Amravait Viral Video : आजच्या डिजिटलच्या युगात कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर रोज वेगवेगळे दावे करणारे व्हिडीओ,फोटो व्हायरल होत असतात. कधी एखाद्या व्यक्तीला गूढ खजिना सापडल्याचा दावा केला जातो, तर कधी एखाद्या व्यक्तीला भूत दिसल्याचा दावा करणारा व्हिडीओ समोर येतो. अशा अनेक कथांमुळे साधेभोळे नागरिक मात्र दहशतीत असतात. सध्या असाच एक दावा करणारा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अमरावती शहरात एका तरुणाला स्त्री भूताने बेदम मारहाण केल्याचं म्हटल जात आहे. या दाव्यामुळे अमरावती शहरात वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहे.
नेमकी चर्चा काय केली जातेय?
मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्यामध्ये छत्री तलावाजवळ युवकाला स्त्री भुताने मारल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. लोकांच्या या दाव्यामुले नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा दावा करताना काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जात आहेत. यातीलच एका फोटोत मारहाण झालेल्या तरुण दिसतोय. तर दुसऱ्या एका फोटोत कथित स्त्री भूत दाखवण्यात आले आहे. काही व्हिडीओंमध्ये काळोख दाखवण्यात आलाय आणि या काळोखात काही महिला घाबरून ओरडताना दिसताय. त्यामुळेच अमरावतीमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
पण नेमके सत्य काय?
अमरावतीत स्त्री भूत असल्याचा दावा केला जात असताना पोलिसांनी मात्र यामागचं सत्य सांगितलं आहे. भूत वगैरे अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्त्वात नाहीत, असं अमरावतीच्या पोलिसांनी सांगितलंय. तसेच दीड वर्षांपूर्वी हीच व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती आणि परिसरात भूत असल्याचा दावा करण्यात आला होता. आम्हाला मारहाण झाली आहे, असा दावा करणारी व्यक्ती आमच्याकडे आलेली नाही. तशी कोणी तक्रारही दिलेली नाही, असे अमरावतीच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
तसेच सध्या शेअर केल्या जात असलेल्या व्हिडीओंना तसेच फोटोंना कोणताही सत्याचा आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही अमरावती शहराचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे.
