Mumbai Crime : मुंबईतही सोनम रघुवंशी ! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला मारून घरातच पुरलं, दीराकडूनच लावून घेतल्या टाईल्स
मुंबईतील नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह तिच्याच घरात पुरला. त्यानंतर तिने तिच्या देवराकडून त्या जागी टायल्स लावल्या. पतीच्या बॉयफ्रेंडसोबतच्या प्रेमसंबंधामुळे पती अडथळा ठरत असल्याने ही हत्या झाली आहे. पोलिसांनी दोघांनाही फरार असल्याचे सांगितले आहे.

प्रेमात पडलेली माणसं वाट्टेल ते करू शकतात, असं म्हटलं जातं. पण काहीवेळा ते असं काही करून बसतात, ज्यामुळे समोरच्याचं अख्खं आयुष्यचं उद्ध्वस्त होऊ शकतं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीच्या केसनने अख्ख्या देशाला हादरवलं आहे. तसाच काहीस प्रकार आता मुंबईतही घडला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढून महिलेने त्याचा मृतदेह राहत्या घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर त्याचा मृतदेह पुरल्यानंतर त्यावर पतीच्या भावाकडून, म्हणजेच दीराकडूनच त्या महिलेने तिथे टाईल्सही लावून घेतल्या. अतिशय थंड डोक्याने केलेली ही हत्या नालासोपाऱ्यात घडली असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मात्र खूपच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील गडगपाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीच्या एका चाळीच्या रुममध्ये हा धक्कादायक खून झाला.गुडीया चमन चौहान असे विवाहीत आरोपी महिलेचे तर मोनू विश्वकर्मा असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तर विजय चौहाने असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. गुडिया आणि विजय या दोघांना एक 8 वर्षांचा मुलगा देखील आहे.
हत्या करून घरातच पुरलं…
आरोपी महिला गुडिया आणि मोनू या दोघांचं नालासोपाऱ्यातील एका चाळीत आजूबाजूलाच घर आहे. विवाहीत असूनही गुडिया हीचं मोनूशी सूत जुळलं, त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र गुडियाचा पती विजय हा त्या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरता होता, अखेर त्या दोघांनी विजयचा काटा काढण्याचा प्लान रचला. त्यानुसार, त्यांनी विजयची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यांच्या राहत्या घरातच त्याचा मृतदेह पुरून ठेवला. एवढंच नव्हे तर हत्येनंतर महिलेने तिच्या पतीच्या भावालास म्हणजेच तिच्या दीराला घरी बोलावलं आणि जिथे पतीचा मृतदेह पुरला, त्यावर दिराकडून टाईल्स बसवून घेतल्या.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, मागच्या 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली असल्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोबाईल मध्ये संशयास्पद मेसेज आढळल्या नंतर तिची चौकशी केली असता, त्यातूनच या भयानक या हत्येचा उलगडा झाला आहे. सध्या आरोपी महिला, तिचा बॉयफ्रेंड हा फरार असून, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघांचाही कसून शोध घेतला जात आहे.
