बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर, नवऱ्यानेही बायकोच्या चितेवर उडी घेऊन आयुष्य संपवलं Chandrapur couple suicide

बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

चंद्रपूर : तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर, नवऱ्यानेही बायकोच्या चितेवर उडी घेऊन आयुष्य संपवल्याची थरारक घटना चंद्रपुरात घडली. पतीने पत्नीच्या सरणावर उडी घेतल्याने दोघांचाही करुण अंत झाला. धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याचं लग्न 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं. मात्र या जोडप्याचा जीवनप्रवास एखाद्या थरारक सिनेमाप्रमाणे संपुष्टात आला. (Chandrapur couple suicide)

चंद्रपूरच्या गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम-तळोधी गावातील घटनेने जनमानस हादरले आहे. गर्भवती विवाहितेची आत्महत्या आणि पाठोपाठ पतीच्या आयुष्याचा शेवट यामागे नक्की कारण काय हे मात्र गूढ आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम- तळोधी गावातल्या एका 19 वर्षीय नवविवाहितेनं दोन दिवसांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होतं. गावातील स्मशानभूमीत त्या नवविवाहितेवर अत्यसंस्कार करताना पेटत्या सरणावर अचानक तिच्या पतीनं उडी घेतली. या प्रकाराने अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

शेवटी उपस्थितांनी धाडस करून त्याला सरणावरुन कसंबसं बाहेर काढलं. पण तोपर्यंत त्याला पेटत्या धगीने जबर जखमी केलं होतं. हा पती इथंच थांबला नाही. सरणावरुन बाहेर काढताच त्यानं लोकांना चुकवून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं.

या किशोर खाटीक असं या पतीचं नाव आहे. त्याचा विवाह भंगाराम-तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिच्याशी नुकताच 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम-तळोधी इथं माहेरी आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिनं गावलागतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता पेटली आणि या पेटत्या चितेवर किशोरनं उडी घेतली. रुचितानं आत्महत्या का केली, हा तपासाचा विषय असतानाच तिच्या पतीनंही असं टोकाचं पाऊल उचलून कुटुंबीयांना जबर धक्का दिला. या नवदाम्पत्याच्या अकाली आणि अनपेक्षित आत्महत्यांमुळं लोकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत. (Chandrapur couple suicide)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *