MPSC च्या परीक्षेचा निर्णय झाला, ठाकरे सरकार दहावी बारावीचं काय करणार?

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे डोळे लागले आहेत. ( SSC HSC MPSC)

MPSC च्या परीक्षेचा निर्णय झाला, ठाकरे सरकार दहावी बारावीचं काय करणार?
प्रातिनिधीक फोटो

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून रविवारी 11 एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, पण दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्याचं ट्विट केलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेसंदर्भात आणि कोरोनासंदर्भात मेसेज येत आहेत. विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता असेल, असं सांगितलं. वर्षा गायकवाड सध्या बोर्डाशी संबंधित अधिकारी आणि तज्ञांशी सविस्तर चर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या भविष्यातील करिअर संकटात येईल, असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे ट्विट

दहावी बारावीचं काय होणार?

हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्यातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. दहावी आणि बारावी वगळता पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याच निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार 23 एप्रिलपासून बारावीची परीक्षा

नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

 

संबंधित बातम्या:

MPSC exam: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; MPSC परीक्षा पुढे ढकलली: सूत्र

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

SSC HSC Exams : राज्यात कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

(Maharashtra Government decided to postpone Secondary Service Group B Exam now SSC and HSC students wait for their exam decision )