
Nitish Kumar may form Non BJP Government: बिहार विधानसभा निवडणूक 2025 निकालाने चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप-जनता दल (संयुक्त) या महायुतीने महाविजय मिळवला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपने सर्वात सरस कामगिरी केली आहे. भाजप राज्यात बिग ब्रदर ठरला आहे. यापूर्वी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील असा भाजपचा सूर होता. पण निकाल येताच त्यांचा सूर बदलला आहे. वरिष्ठ नेते याविषयीचा निर्णय घेतील असा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) त्सुनामी आली आहे. 243 जागांपैकी 202 जागा त्यांनी खेचून आणल्या. महाआघाडीला 35 जागाच कशातरी टिकवता आल्या. तर एमआयएमने 5 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) 2010 नंतरची ही सर्वात खराब कामगिरी आहे.
भाजप 89 जागांसह बिग बॉस
या निवडणुकीत 89 जागांसह भाजप बिग बॉस ठरली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचा मित्र पक्ष जेडीयू आहे. भाजपला बिहारमध्ये एकहाती सत्ता मिळवायची आहे. गेल्या दोन वेळेपासून भाजपला तडजोड करावी लागत आहे. गेल्यावेळी चांगल्या जागा हाती असतानाही भाजपने नितीश कुमार यांच्यासाठी मन मोठे केलं होतं. सध्या भाजपचे सूर बदलल्यासारखे वाटत आहेत. पण नितीश कुमार यांना हलक्यात घेणे भाजपला कठीण जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार 10 व्या वेळा मुख्यमंत्री पदी विराजमान होतील. नितीश कुमार यांनी मनात आणले तर भाजपविना सुद्धा ते सहज सरकार तयार करू शकतात.
कुणाच्या पारड्यात किती जागा?
NDA ला बहुमत मिळाले आहे. या महायुतीने एकूण 202 जागांवर विजय मिळवला आहे. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागांवर विजय मिळाला. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 85 जागा मिलाल्या. चिराग पासवान यांच्या LJP(RV) या पक्षाने 19 जागांवर तर “हम” या पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला आहे.
महाआघाडीला किती जागा?
विरोधी महाआघाडीतील आरजेडीला 25 जागा तर मित्रपक्ष काँग्रेसला 6 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी आहे. आरजेडीला पण मोठा फटका बसला आहे. तर ओवेसी यांच्या एआयएमआयएमने मोठी मजल मारली आहे. या पक्षाचे 5 आमदार निवडून आले आहेत. तर 9 जागांवर इतर पक्षांना फायदा झाला आहे.
बिगर भाजप सरकार कसे तयार होणार?
नितीश कुमार यांना भाजपने यापूर्वी पलटू चाचा नावाने डिवचले आहे. यापूर्वी त्यांनी भाजपची साथ सोडून बिहारमध्ये सत्तेचा प्रयोग केला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासोबत जाणे ही भाजपची सध्याची गरज असली तरी नितीश कुमार यांना भाजपची गरज आहेच, असे नाही. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी नितीश कुमार यांना काही तडजोडी कराव्या लागतील.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला 85 जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये त्यांना सरकार तयार करण्यासाठी 37 जागांची गरज आहे. काँग्रेस, आरजेडी आणि एमआयएमसह इतर एक आकडी आमदारांना स्वतःकडे वळविण्यात जर ते यशस्वी ठरले तर बिहारमध्ये बिगर भाजपचे सरकार अस्तित्वात येऊ शकते.
विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजप विरोधी बाकड्यावर
आरजेडी 25
काँग्रेस 06
डावे पक्ष 03
AIMIM 05
आयपी गुप्ता 01
एकूण 45
नितीश कुमार यांना बहुमतासाठी केवळ 37 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तर हे विरोधक एकत्र आल्यास हा आकडा 45 इतका होतो. नितीश कुमार हे विना भाजप सरकार स्थापन करू शकतात असे या आकडेवारीवरून समोर येत आहे.