
Bihar Election Result 2025: बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(NDA) एक हाती विजयश्री खेचून आणल्याचे चित्र आहे. सध्याचे जे कल आहेत. त्यावरून महाआघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येते. एनडीए 190 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी 42 जागांवर स्थिरावल्याचे कलाचे आकडे सांगत आहेत. म्हणजे एनडीएने एकतर्फी विजय मिळवला आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मोठा भाऊ कोण? याची लढाई सुरू झाली आहे. भाजप 85 जागा तर जेडीयू 78 जागांवर पुढे आहे. त्यावरून बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार का? शिंदेंच्या वाटेवर नितीश कुमार जातील का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
गेल्या सहा महिन्यात मोठी चर्चा
बिहारचे मुख्यमंत्री कोण होईल? ही चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून रंगली आहे. यापूर्वी विरोधकांनी भाजप हा सुरुवातीला सोबत लढतो आणि मग मित्र पक्षाला संपवतो असा आरोप केला होता. तर नितीश कुमार यांची प्रकृती साथ देत नसल्याचे विधानही आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी केले होते. तर भाजपमधील गोटातही अशीच चर्चा होती. तर यावेळी जेडीयू चांगली दमदार कामगिरी करु शकणार नाही असा अनेकांचा व्होरा होता. त्यातूनच भाजप निकालानंतर अधिक जागांचा दावा करत मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. तर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत संख्याबळाच्या आधारावर भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर आले.
१. सध्याच्या निकालाच्या कलानुसार एनडीएमध्ये भाजप हाच बिग ब्रदर ठरला आहे. तर त्याखालोखाल जेडीयूने मोठी मजल मारली आहे. पण संख्याबळावर कदाचित भाजप मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतो.
२. नितीश कुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची ऑफर दिल्या जाऊ शकते. त्यांचे एखाद्या महत्त्वाच्या खात्यावर पुनर्वसन करण्यात येऊ शकते. त्याऐवजी भाजपचा अथवा जेडीयूचा दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पदी आणल्या जाऊ शकते.
३. तर काही दिवस नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद देऊन पुढे त्यांचे मन वळविण्यात येऊ शकते. निकालानंतर होणाऱ्या बैठकांच्या सत्रात नेमकं काय ठरतं यावर समोरील गणितं अवलंबून आहेत.
४. नितीश कुमार हे आता एनडीए सोडून जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासमोर आता दुसरा मोठा पर्याय दिसत नाहीत. कारण विरोधकांची 50 जागांची मजल मारतानाच दमछाक झाली आहे. त्यामुळे पुढे जर भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला तर नितीश कुमार यांच्यासमोर पाठिंब्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
५, नितीश कुमार यांची छबी कोणताही भ्रष्टाचार न केलेला नेता अशी असली तरी ते जर विरोधात गेले. त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली तर कदाचित हळूहळू काही प्रकरणं समोर येऊन यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याची भीती यापूर्वीच विरोधकांनी बोलून दाखवली आहे.
नितीश कुमार हेच मुख्यमंत्री
निकालामध्ये भाजपला नितीश कुमार यांच्या जेडीयूने सुद्धा तोडीस तोड कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री पदावरून अजूनही संभ्रम असला तरी भाजपचे काही नेते हे नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील असा दावा करत आहेत. भाजपचे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदी असतील अशी घोषणा केली आहे. निकालानंतर अजून सत्ता स्थापनेचा मुहूर्त दूर आहे. त्यामुळे या कालावधीत काहीही घडू शकतं, याकडे काही राजकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.