
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पंजाबमधील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चडवला आहे. मोदी घृणास्पद भाषण देत आहेत. त्यांनी पंतप्रधान पदाची पत आणि प्रतिष्ठा कमी केली आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोलच मनमोहन सिंग यांनी केला आहे. शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वीच मनमोहन सिंग यांनी मोदींवर हल्ला चढवून त्यांच्या दहा वर्षाच्या कामगिरीचा पंचनामाही केला आहे.
या देशात काँग्रेसच केवळ विकास आणि प्रगतीशील भविष्य देऊ शकते. काँग्रेस सत्तेत आल्यावरच लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण होणार आहे. देशात अमानवीकरणाचा प्रकार परमोच्च बिंदूवर गेला आहे. त्यामुळेच आता आपल्याला या शक्तींपासून आपला देश वाचवायचा आहे, असं मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. देशभक्ती, शौर्य आणि सेवेचं मूल्य केवळ चार वर्षाचं आहे, असं भाजपला वाटतंय. यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येत आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अग्निवीर योजनेवरून भाजपला धारेवर धरलं होतं.
यावेळी त्यांनी मोदींच्या भाषणांवरही आक्षेप घेतला. मी या निवडणुकीतील राजकीय चर्चांकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहे. मोदींनी अत्यंत द्वेषपूर्ण भाषणं केली आहेत. ही भाषणं विभाजनकारी आहेत. सार्वजनिक चर्चांचा आब कमी करतानाच पंतप्रधान कार्यालयाचं गांभीर्य घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. या पूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी अत्यंत घृणास्पद, असंसदीय आणि असभ्य शब्दांचा कधीच वापर केला नव्हता, असंही त्यांनी म्हटलंय.
मोदींच्या भाषणांचा हेतू समाजातील एका विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना टार्गेट करण्याचा होता, असं ते म्हणाले. तसेच मोदींच्या वारंवार खोटं बोलण्यावरही त्यांनी टीका केली. माझ्या आयुष्यात मी कधीच असं केलं नाही… हे वाक्य भाजपचं कॉपीराईट वाक्य झालं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.