मावळ लोकसभा निकाल 2024 : मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी, संजोग वाघेरे पराभूत

स्थापनेपासूनच हा मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेला साथ देणारा आहे. या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत झाली. शिंदे गटाने दोन टर्मचे खासदार श्रीरंग बारणे यांना तर ठाकरे गटाने पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरली. सुरुवातीला महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक संजोग वाघेरे यांच्यामुळे नंतर अधिकच चुरशीची बनली होती.

मावळ लोकसभा निकाल 2024 : मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी, संजोग वाघेरे पराभूत
लोकसभा निवडणूक
| Updated on: Jun 04, 2024 | 7:48 PM

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे मतमोजणीच्या 20 व्या फेरीमध्ये 5,94,682 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे यांना 4,99,436 मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे  20 व्या फेरीनंतर 95,246 मतांनी आघाडीवर  होते. त्यामुळे मावळ मतदार संघात शिंदे सेना जिंकते की ठाकरे सेना याची उत्सुकता लागली होती, अखेर श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मताधिक्याने निवडून आले आहेत.

या मतदार संघात मतमोजणीच्या आधीच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याची टिका केल्याने खळबळ उडाली होती. मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले होते. या मावळ लोकसभा मतदार संघात गेल्यावेळी साल 2019 मध्ये 59.57 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. मावळ मतदारसंघात यावेळी 54.87 टक्के मतदान झाले आहे. यंदा 4.73 टक्क्यांनी मतदान घटले आहे. यंदा या मतदार संघात एकूण 33 उमेदवार रिंगणात होते तरी मुख्य लढत महायुतीचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात होती.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर विद्यमान खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. जागावाटपामध्ये ही जागा शिंदे यांना मिळाल्यानंतर खासदार बारणे यांनाच उमेदवारी दिली गेली. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उभे केले. विशेष म्हणजे हे दोघे एकमेकांचे नातेवाईकच असल्याने परस्परांवर त्यांनी जास्त टिकाटिपण्णी केलेली नाही. बारणे आणि वाघेरे हे दोघेही पिंपरी-चिंचवडमधील आहेत. त्यांच्या नात्यातील लोकांनी कोणाच्या पारड्यात अधिक दान टाकलेय त्यावर मावळचा निकाल अवलंबून होता.

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. या लोकसभा मतदार संघात 25 लाख 85 हजार 18 मतदार आहेत. यापैकी 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात 50.05 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सुधारीत आकडेवारीत सांगितले. 2019 साली झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा क्षेत्रातील 55.33 टक्के म्हणजेच 2,98,349 मतदारांनी मतदान केले होते.

पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या सहा विधानसभा मतदारसंघांत चिंचवड आणि पनवेल हे दोन मतदारसंघ विजय आणि पराभव ठरविणारे असल्याचे म्हटले जाते. स्थापनेपासूनच हा मावळ मतदार संघ शिवसेनेला साथ देणारा आहे. या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होत आहे. प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक संजोग वाघेरे यांच्यामुळे नंतर अधिकच चुरशीची बनली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. शिवसेनेच्या मतांची दोन गटांत विभागणी झाल्याने बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवर होती. पुणे आणि रायगड जिल्ह्यात मोडणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी तसेच निमशहरी आणि ग्रामीण भाग देखील येतो. सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार असतानाही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव करून दोन वेळा दिल्ली गाठणारे बारणे यांच्या समोर तिसऱ्या वेळी मात्र आव्हान आहे.

सोपी वाटणारी निवडणूक अवघड बनली

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जतचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवर होती. पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार आहेत. उरणचे महेश बालदी हे भाजपचे मित्र आहेत. मावळला सुनील शेळके, पिंपरीत अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मावळमध्ये निदान कागदावर तरी महायुतीची बलवान असल्याने बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी वाटत होती. परंतु, महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या संजोग वाघेरे यांनाच ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंग चढला. वाघेरेंनी आपल्या पिंपरी-चिंचवड, मावळमधील नातलंगाची मदत घेत जुन्या पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच प्रचार सुरू केला.

चिंचवड, पनवेलचे मतदान निर्णायक

या मतदारसंघात 25 लाख मतदार असून एकट्या चिंचवड आणि पनवेल या दोन मतदारसंघांत 11 लाख 61 हजार मतदार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ शहरी असून, त्यावर भाजपचे वर्चस्व असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून, मावळचा खासदार ठरविणार आहेत. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड आणि त्याखालोखाल मतदार असलेल्या पनवेल या दोन्ही मतदारसंघांत सहा लाख 18 हजार 673 मतदान झाले आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले असल्याचे म्हटले जाते.

असे झाले मतदान –

पनवेल – 50.05

कर्जत – 61.40

उरण – 67.07

मावळ – 55.42

चिंचवड – 52.20

पिंपरी – 50.55

 

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर