Punjab Assembly Election 2022: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांसह दहा ठिकाणी छापेमारी

Punjab Assembly Election 2022: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांसह दहा ठिकाणी छापेमारी
CM Charanjit singh Channi

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 18, 2022 | 1:41 PM

चंदीगड: पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. बेकायदेशीररित्या सँड मायनिंग सुरू असल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. भूपेंद्र सिंग हनी असं मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव असल्याचं सांगितलं जात असून त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. ईडीच्या 8 सदस्यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे. तसेच ईडीने राज्यात अन्य दहा ठिकाणीही छापेमारी केली आहे.

ईडीच्या टीमने आज सकाळी 8 वाजता मोहालीतील होमलँड सोसायटीतील भूपेंद्र सिंह हनी यांच्या फ्लॅटवर छापा मारला. त्यानंतर ईडीने भूपेंद्र सिंग हनी यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. ईडीची छापेमारी अजूनही सुरू असून या ठिकाणी सीआरपीएफच्या टीमचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेकायदा ठेका मिळवला

भूपेंद्र सिंग हनी यांच्या घरासहीत संपूर्ण पंजाबमध्ये 10-12 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. भूपेंद्र सिंग यांच्यावर बेकायदेशीरपणे वाळू उपसाचे कंत्राट घेतल्याचा आरोप आहे. हा ठेका मिळवण्यासाठी त्यांनी पंजाब रियल्टर्स नावाची एक फर्म बनवली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ही छापेमारी सुरू असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. आधी पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होतं. मात्र, संत रविदासांची जयंती असल्याने ही निवडणूक चार दिवसाने पुढे ढकलण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली आहे.

आधीही आरोप

यापूर्वीही बेकायदा वाळू उपसाचा मुद्दा राज्यात तापला होता. माजी आमदार सुखपाल सिंग खैहरा यांनी या प्रकरणावर सर्वात आधी आवाज उठवला होता. खैहरा यांनी या प्रकरणी थेट चन्नींवर आरोप केला होता. त्यावेळी चरणजीत सिंग चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण मंत्री होते. मात्र, त्यावेळी चन्नी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भूपेंद्र सिंग यांच्या बेकायदेशीर वाळू उपसा ठेकेदारीत चन्नी यांनी ढवळाढवळ तर केली नव्हती ना? याची चौकशी ईडी करत आहे. अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्या गेल्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या:

Punjab Assembly Election 2022: ‘आप’कडून भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, पब्लिक व्होटिंगनंतर केजरीवाल यांचा निर्णय

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? पहिल्या स्थानी चन्नी, सिद्धू कितव्या?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें