चित्रपट पाहिजे तर असा, नाना पाटेकरांचा 37 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याचा हॉलिवूडमध्ये बनलेला रीमेक
नाना पाटेकर यांचा 37 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला IMDb रेटिं देखील होती 7.8. या चित्रपटानंतर हॉलिवूडमध्ये बनवण्यात आला होता रिमेक. या चित्रपटाने नाना पाटेकरांना दिलं होता नॅशनल अवॉर्ड.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाची केवळ भारतातच नाही तर परदेशातही दखल घेतली गेली. नाना पाटेकर यांना स्टारडम मिळवून देणाऱ्या चित्रपटांपैकी ‘परिंदा’ हा एक महत्त्वाचा चित्रपट होता. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते.
‘परिंदा’मध्ये नाना पाटेकर यांनी अण्णा नावाच्या खतरनाक डॉनची भूमिका साकारली होती. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी दोन भावांची भूमिका केली होती तर माधुरी दीक्षितही या चित्रपटाचा भाग होती. अंडरवर्ल्डचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमध्ये ‘परिंदा’चा समावेश केला जातो.
या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ‘परिंदा’ने दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. तसेच भारताकडून ऑस्करसाठीही या चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली होती. नाना पाटेकर यांना याच चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. IMDb वर या चित्रपटाला 7.8 रेटिंग मिळाले आहे.
‘परिंदा’चा तमिळनंतर हॉलीवूडमध्ये रिमेक
‘परिंदा’चा 1998 मध्ये तमिळ भाषेत ‘आसई थंबी’ या नावाने रिमेक करण्यात आला. मात्र, त्यानंतर या चित्रपटाने थेट हॉलीवूडमध्ये मजल मारली. 2012 मध्ये विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा’चा अमेरिकन प्रेक्षकांसाठी रिमेक बनवणार असल्याचे जाहीर केले. अभिजात जोशी यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटाचे स्क्रीनप्ले लिहिले.
हॉलीवूडमध्ये या चित्रपटाचे नाव ‘ब्रोकन हॉर्सेस’ ठेवण्यात आले. या चित्रपटात विंसेंट डी’ओनोफ्रियो यांनी नाना पाटेकरांनी साकारलेल्या अण्णाच्या व्यक्तिरेखेवर आधारित भूमिका केली. दोन भावांच्या भूमिका एंटोन येल्चिन आणि क्रिस मार्क्वेट यांनी साकारल्या.
‘ब्रोकन हॉर्सेस’ची कथा अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात सेट करण्यात आली होती. चित्रपटात रँच, गनफाइट्स आणि स्पॅनिश सीमेच्या आसपासच्या ड्रग वॉरची पार्श्वभूमी दाखवण्यात आली. टॉम स्टर्न यांनी सिनेमॅटोग्राफी, तर जॉन डेबनी यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली.
हॉलीवूडमध्ये मात्र चित्रपट ठरला फ्लॉप
‘परिंदा’ला मिळालेल्या यशाच्या तुलनेत ‘ब्रोकन हॉर्सेस’ला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे 15 मिलियन डॉलरच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची अमेरिकेतील कमाई अत्यंत कमी राहिली. भारतातही या चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली.
