सलमान खानच्या ताफ्यात अचानक घुसला बाईकस्वार, पुढे जे घडले…
सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी एक दुचाकीस्वार अचानक सलमान खानच्या ताफ्यात घुसला. सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या सुरक्षेत कुठेही जातो. त्याला अनेकदा मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याच्यासोबत काही खाजगी सुरक्षा रक्षक देखील असतात. या दरम्यानकाल मुंबईत त्याच्या सुरक्षेत भंग झाला आहे. सलमान खानला एस्कॉर्ट करत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यात एक दुचाकीस्वार अचानक घुसला. लगेचच सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बेजबाबदारपणे गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी घडली. रात्री 12.15 च्या सुमारास घडली. सलमान खानचा ताफा माहुब स्टुडिओजवळून जात असताना, 21 वर्षीय उझैर फैज मोईउद्दीन नावाच्या दुचाकीस्वाराने सलमान खानच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताकीदही दिली, मात्र तो सलमान खानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिला. सलमान खान त्याच्या घरी पोहोचल्यावर पोलिसांच्या दोन वाहनांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी केली असता तो पश्चिम वांद्रे येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या आल्या आहेत. या कारणास्तव त्याला Y+ सुरक्षा मिळाली आहे. यासोबतच मुंबई पोलिसही सलमानला सुरक्षा पुरवतात. या वर्षी एप्रिलमध्ये, सलमान खानच्या सुरक्षेबाबत गंभीर संकट आले होते जेव्हा दुचाकीस्वार नेमबाजांनी त्याच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. याआधीही सलमान खानला अनेकदा धमक्या आल्या होत्या. त्याचे वडील लेखक सलीम खान यांना गँगस्टर बिश्नोईचे नाव सांगून धमकी देण्यात आली होती. जून 2022 मध्ये, सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर वांद्रे बँडस्टँडवर एका बाकावर बसले होते, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र दिले.