आता जोडीने वाढणार खमंग जेवणाची गोडी, सोबतीला असेल धमाल अन् कमाल लव्हस्टोरी
सेलिब्रिटी जोड्यांच्या खास रेसिपीज, मजेशीर किस्से आणि मराठी संस्कृतीच्या चविष्ट वाटा असलेला ‘आम्ही सारे खवय्ये - जोडीचा मामला’ हा कार्यक्रम येत्या 9 ऑगस्टपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दुपारी 1 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांची मनं जिंकलेला लोकप्रिय कुकरी शो ‘आम्ही सारे खवय्ये’ पुन्हा एकदा परततोय, पण यावेळी एक रूपात आणि खास ढंगात. ‘जोडीचा मामला’या नव्या थीमनं सजलेलं हे पर्व असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांच्या आवडत्या सेलिब्रिटी जोड्या स्वयंपाकघरातल्या काही खास रेसेपीज करताना बघायला मिळणार आहेत. प्रत्येक भागात नव्या सेलिब्रिटी जोडप्याचं खास स्वागत केलं जाईल, जिथं ते त्यांच्या आयुष्यातले खास क्षण, त्यांचे आवडते पदार्थ, आणि त्यामागच्या गोड आठवणी शेअर करतील. कधी प्रेमाची सुरुवात, कधी काही गंमतीशीर गोष्टी, तर कधी कौटुंबिक परंपरेतून आलेल्या पाककृती अशा विविध गोष्टींनी समृद्ध असलेल हे पर्व, जेवणापलीकडची नाती उलगडून दाखवणार आहे.
स्वयंपाक करताना दोघांमधील केमिस्ट्री, एकमेकांवरच्या मिश्किल गोष्टी, आणि त्यातले प्रेमाचे हळवे क्षण हे सगळं प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं आपलंसं वाटणार आहे. या पर्वाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मराठी खाद्यसंस्कृतीशी असलेली घट्ट नाळ. प्रत्येक जोडपं त्यांच्या खास प्रादेशिक पाककृतींमधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चविंचा आणि परंपरांचा परिचय करून देणार आहे.
View this post on Instagram
या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर आहे. या नव्या रंगतदार थीमनं सजलेल्या पर्वाबद्दल तो म्हणाला ,”खरं सांगायचं तर, स्वयंपाकघर हे फक्त चविष्ट पदार्थ बनवण्याचं ठिकाण नसतं. तिथं रोजच्या आयुष्यातले खास क्षण तयार होत असतात. दोन माणसं एकत्र जेव्हा काहीतरी बनवतात, तेव्हा ताटात फक्त जेवण नसतं, तर त्यांचं नातंही आणखी घट्ट झालेलं असतं. हे नवीन पर्व म्हणजे त्या नात्यांचा आणि आठवणींचा एक गोड सुगंध आहे. कुणाचं लग्न झाल्यावर पहिलं पुरणपोळीचं जेवण, कुणाचा पहिला झणझणीत मिसळ खाल्ल्याचा किस्सा, आणि त्यामागच्या मजेदार गप्पा हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. ही फक्त पाककृतींची सफर नाही, ही प्रेम, स्नेह आणि संस्कृती यांची चविष्ट गोष्ट आहे.”
