60 वर्षांचा आमिर, 23 वर्षांनी लहान रितेश देशमुखच्या पत्नीशी रोमान्स; वयातील फरकाबद्दल म्हणाला..
आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुखसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. परंतु जिनिलिया आणि त्याच्या वयात बरंच अंतर आहे.

अभिनयातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर अखेर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात तो अभिनेत्री जिनिलिया देशमुखसोबत झळकणार आहे. यामध्ये जिनिलिया आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ही जोडी पाहून प्रेक्षक चांगलेच थक्क झाले आहेत. कारण आमिर स्वत: 60 वर्षांचा असून जिनिलिया त्याच्यापेक्षा वयाने 23 वर्षांनी लहान आहे. सलमान खान, शाहरुख खान यांसारखे कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करताना अनेकदा दिसले, तेव्हासुद्धा हा मुद्दा चर्चेत होता. आता आमिरच्या चित्रपटामुळे तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने यावर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.
आमिरचा भाचा इमरान खान याच्यासोबत जिनिलियाने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर आता जवळपास 15 वर्षांनंतर ती आमिरसोबत काम करतेय. याविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “हो, मला माहीत आहे. तो विचार माझ्याही मनात आला होता. पण त्या चित्रपटाला आता बरीच वर्षे झाली आहेत आणि इमरानसुद्धा आता जवळपास माझ्याच वयाचा झाला आहे (हसतो).”
View this post on Instagram
वयातील फरकाबद्दल तो पुढे म्हणाला, “आता आपल्याकडे व्हीएफएक्सची सुविधा आहे. काही वर्षांपूर्वी जर मला 18 वर्षांच्या मुलाची भूमिका साकारायची असेल तर प्रोस्थेटिक्सवर अवलंबून राहावं लागायचं. अभिनेते अनिल कपूर यांना ‘ईश्वर’ या चित्रपटात 80 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारताना तेच करावं लागलं होतं. पण आज तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने स्क्रीनवर 80 किंवा 40 किंवा 20 वर्षांचेही दिसू शकता. त्यामुळे कलाकारांसाठी वयाचं बंधन आता राहिलेलं नाही.”
‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटानंतर आमिरने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतोय. आर. एस. प्रसन्न यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 20 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
