घटस्फोटाबद्दल स्पष्टीकरण देणाऱ्या अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ व्हिडीओमागचं सत्य समोर

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बऱ्याच चर्चा आहेत. त्यातच अभिषेकचा AI जनरेटेड व्हिडीओ व्हायरल झाल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. त्यानंतर अभिषेकने स्पष्टीकरण दिल्याचं म्हटलं जातंय. आता त्याच व्हिडीओमागचं सत्य समोर आलं आहे.

घटस्फोटाबद्दल स्पष्टीकरण देणाऱ्या अभिषेक बच्चनच्या त्या व्हिडीओमागचं सत्य समोर
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2024 | 4:27 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहेत. मात्र त्यावर दोघांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. घटस्फोटाबाबतच्या या संपूर्ण चर्चेदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्याने आदरयुक्त मौन बाळगणंच पसंत केलं आहे. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे आले, तेव्हा या चर्चांना आणखी हवा मिळाली. अभिषेक त्याच्या कुटुंबीयांसोबत आला, तर दुसरीकडे ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत आली होती. या सर्व घटनांदरम्यान अभिषेकचा डीपफेक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. ज्यामध्ये तो ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याचं बोलताना दिसला. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (AI) हा फेक व्हिडीओ बनवण्यात आला होता. या व्हिडीओनंतर अभिषेकने स्वत: घटस्फोटावर प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त समोर आलं. अभिषेकने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत अजूनही ऐश्वर्यासोबत विवाहित असल्याचं या मुलाखतीत सांगितल्याचं म्हटलं गेलं. मात्र आता त्या व्हिडीओचीही सत्यता समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाला अभिषेक?

“मला या सर्व चर्चांवर काहीच बोलायचं नाही. दुर्दैवाने तुम्ही सर्वांनी या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त हवा दिली आहे. मी हे समजू शकतो की तुम्ही असं का करताय? तुम्हाला काही स्टोरीज फाइल करायच्या असतात. ठीक आहे, आम्ही सेलिब्रिटी असल्याने अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. माफ करा, पण आम्ही अजूनही विवाहित आहोत”, असं अभिषेकचं वक्तव्य असल्याचं म्हटलं गेलंय. यामध्ये अभिषेक त्याची साखरपुड्याची अंगठीसुद्धा दाखवल्याचं सांगितलं गेलं.

व्हिडीओमागचं सत्य-

अभिषेकचा हा व्हिडीओ खरंतर 2016 मधील आहे. ऐश्वर्याच्या ‘सरबजीत’ या चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर त्याने ही प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळीही ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अभिषेकच्या प्रतिक्रियेचा तो जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. घटस्फोटाच्या चर्चांवर त्याने आता प्रतिक्रिया दिल्याचं म्हटलं जातंय. पण अभिषेक किंवा ऐश्वर्याने त्यावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली होती. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित होती. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट आता अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Follow Us