निम्रत कौरसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर अभिषेकने सोडलं मौन?
'दसवी' या चित्रपटातील सहकलाकार निम्रत कौरसोबत अभिषेक बच्चनच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर त्याने मौन सोडल्याचं म्हटलं जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. एकीकडे पत्नी ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव निम्रत कौरशी जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम कलं होतं. अभिषेकचं निम्रतशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चांवर अखेर त्याने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो अफवा आणि खोट्या बातम्यांबद्दल व्यक्त झाला. यावेळी त्याने निम्रतचं थेट नाव घेतलं नाही, परंतु अशा सर्व चर्चा अस्वस्थ करणारं असल्याचं म्हटलंय.
काय म्हणाला अभिषेक?
“जी व्यक्ती चुकीची किंवा खोटी माहिती पसरवतेय, त्या व्यक्तीला ते स्पष्ट करण्यात किंवा सुधारणा करण्यात काहीच रस नाही. याआधी माझ्याबद्दल बोलल्या गेलेल्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला नव्हता. परंतु आज माझं एक कुटुंब आहे आणि हे सर्व खूप अस्वस्थ करणारं आहे. जरी मी काही स्पष्टीकरण दिलं तरी लोक त्याचा उलट अर्थ काढतील. कारण नकारात्मक बातम्या विकल्या जातात. तुम्ही माझ्या जागी नाही आहात. तुम्ही माझं जीवन जगत नाही. ज्या लोकांना मी जबाबदार आहे, त्यांना तुम्ही जबाबदार नाही आहात,” असं तो म्हणाला.
“जे लोक अशी नकारात्मकता पसरवतात, त्यांना त्यांच्या विवेकाने जगावं लागतं. त्यांना त्यांच्या विवेकाने वागावं लागतं आणि त्यांच्या निर्मात्याला उत्तर द्यावं लागतं. हे पहा.. हे फक्त माझ्याबाबत नाही. याने फक्त मी प्रभावित होत नाही. मला माहीत आहे की इथली कठीण परिस्थिती काय आहे. त्यात कुटुंबं गुंतलेली आहेत. मी तुम्हाला ट्रोलिंगच्या या संपूर्ण नवीन फॅडचं एक चांगलं उदाहरण देऊ शकतो”, अशा शब्दांत अभिषेक व्यक्त झाला.
जेव्हा अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता तेव्हा बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने म्हटलं होतं की अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक कधीच करणार नाही. अभिषेक त्याच्या नात्यात नेहमीच प्रामाणिक राहिला आहे. त्यामुळे सध्या ज्या काही चर्चा होत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. “ही अफेअरची चर्चा कधी आणि कुठून सुरू झाली? अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक करणाऱ्यांपैकी नाही. तो पूर्पणे प्रामाणिक आहे. अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यात आधीच वादळ आलं असताना तो असं का करेल”, असा प्रतिप्रश्न संबंधित व्यक्तीने केला होता. या अफवांमुळे बच्चन कुटुंबीय खूप नाराज असल्याचंही त्याने म्हटलं होतं.
