
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या ‘कालीधर लापता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. अगदी ‘महानायक’ अमिताभ बच्चनही आपल्या मुलाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलाचं कौतुक केलं होतं. बिग बींनी आपल्या मुलासाठी असं लिहिलं होतं की, हा चित्रपट पाहताना कुठेही असं वाटलं नाही की हा अभिषेक बच्चन आहे. पण एक वेळ अशी होते जेव्हा अभिषेक दहशतवाद्याची भूमिका साकारणार होता. जेव्हा बिग बींना हे कळाले तेव्हा नेमकं काय झालं जाणून घ्या..
अमिताभ यांचं मार्गदर्शन
विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन अभिषेकच्या कामाने प्रभावित होतात, तेव्हा ते त्याचं खूप कौतुक करतात. तसेच, मुलाच्या कारकीर्दीला मार्गदर्शनही करतात. अभिषेकच्या अभिनय पदार्पणाच्या वेळीही बिग बींनी ज्युनियर बच्चनला मोठा सल्ला दिला होता. पहिल्याच चित्रपटात अभिषेक पाकिस्तानी दहशतवाद्याची भूमिका साकारू इच्छित होता, पण बिग बींच्या सांगण्यावरून अभिषेकने तो चित्रपट सोडला होता.
या चित्रपटात पाकिस्तानी दहशतवादी बनणार होता अभिषेक
अभिषेक बच्चनने अभिनय पदार्पणापूर्वी आपले वडील अमिताभ बच्चन आणि अजय देवगन यांच्या ‘मेजर साब’ (1998) या चित्रपटात प्रोडक्शन बॉय म्हणून काम केलं होतं. या चित्रपटाचे निर्माते बिग बी स्वतः होते. त्यानंतर अभिषेकने वडिलांचा मार्ग अनुसरत अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्याचं पदार्पण ‘समझौता एक्सप्रेस’ या चित्रपटातून होणार होतं. हा चित्रपट अभिषेकला दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ऑफर केला होता.
अमिताभ यांनी ठेवली अक्कल ठिकाणावर
अभिषेकने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता, पण जेव्हा अभिषेक आणि राकेश यांनी अमिताभ बच्चन यांना स्क्रिप्ट ऐकवली, तेव्हा बिग बींनी ती नाकारली. त्यांनी ती स्क्रिप्ट बकवास असल्याचं सांगितलं. वडिलांचं हे बोलणं ऐकून अभिषेकने त्या चित्रपटापासून काढता पाय घेतला.
‘रिफ्यूजी’मधून केलं पदार्पण
समझौता एक्सप्रेसचा ऑफर नाकारल्यानंतर अभिषेकने आपल्या बॉलिवूड कारकीर्दीची सुरुवात ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून केली. हा चित्रपट 30 जून 2000 रोजी रिलीज झाला होता. यात त्याच्या सोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती. हा करीनाचाही पदार्पण चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.