बाथरुमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या घरात घुसून पळवली तिजोरी; सापळा रचून पोलिसांनी चोराला ठोकल्या बेड्या
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिमन्यू सिंह याच्या घरी कोट्यवधी रुपयांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. चोराने बाथरुमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने थेट तिजोरीच पळवली होती.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू सिंह याच्या घरी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचं कोडं सोडवण्यात अखेर ओशिवरा पोलिसांनी यश मिळालं आहे. अंधेरी पश्चिम इथल्या लोखंडवाला परिसरात अभिमन्यूचं घर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कुख्यात आणि सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी जवळपास 92% वस्तू जप्त केल्या आहेत. ही घटना 29 डिसेंबर 2025 च्या रात्री लोखंडवाला इथल्या मॅग्नम टॉवरमधील बंगला क्रमांक 15 मध्ये घडली होती. हा चोर बाथरुमच्या खिडकीतून अभिमन्यू यांच्या घरात घुसला आणि घरातील कपाटात ठेवलेली तिजोरीच त्याने पळवली होती. या तिजोरीत सोन्याचे मौल्यवान दागिने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने यांसह मोठ्या प्रमाणात रोख रक्कम होती.
अभिमन्यू यांच्या घरातून चोरी झालेल्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 1 कोटी 37 लाख 20 हजार रुपये होती. या चोरीच्या घटनेची तक्रार मिळताच ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. आरोपीचा कोणताही निश्चित पत्ता नसल्याने हे प्रकरण सोडवणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कदम यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं. टेक्निकल माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने या पथकाने दोन दिवस कसून सापळा रचला होता, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. अखेर 3 जानेवारी 2026 रोजी आरोपीला पकडण्यात यश आलं.
अटकेनंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजार रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले. पोलिसांच्या तपासात आरोपीविषयी धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे चौकशीदरम्यान आरोपीकडून ओशिवरा आणि इतर भागातील अनेक चोरींच्या घटना उघडकीस येऊ शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
अभिमन्यूने हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘गुलाल’, ‘रक्त चरित्र’, ‘थलाइवा’ आणि ‘एल 2: एम्पुरान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.
