अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का

अभिनेता अमेय वाघ (Actor Amey Wagh) एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला.

अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर 'होम क्वारंटाईन'चा शिक्का

मुंबई : अभिनेता अमेय वाघ (Actor Amey Wagh) एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला. कोरोना अमेरिकेतही वाढल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींना सोमोरे जावे लागले, याबाबत अमेयने स्वत: आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे. या व्हिडीओत अमेयने (Actor Amey Wagh) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रशासनाचं, विमानतळावर कोरोना टेस्ट घेणारे डॉक्टर, पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत धन्यवाद मानले.

काय म्हणाला अमेय?

“आमचा अमर फोटो स्टुडिओच्या एका नाटकाचा अमेरिका आणि कॅनडा दौरा होता. तिथे एकूण 14 प्रयोग होणार होते. मात्र, 14 पैकी फक्त तीनच प्रयोग होऊ शकले आणि 11 प्रयोग रद्द झाले. आम्ही कॅलिफोर्नियाच्या बेरिया येथे होतो. तिथेही परिस्थिती भयानक होती. सगळंच अवघड झालं होतं. तिथल्या दुकानांमध्ये साधा ब्रेडही मिळत नव्हता. जीवनाश्मक वस्तू संपल्या होत्या. भरपूर गर्दी होती.

मी माझ्या नातेवाईकांकडे होतो. ते माझी फार छान काळजी घेत होते. अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या. मात्र, नशिबाने एक मिळाली. आम्ही काल (19 मार्च) मुंबईत आलो. काल मुंबईत आमचं विमान लँड झालं. खूप टेन्शन होतं की विमान लँड झाल्यावर किती वेळ विमानतळावरुन बाहेर निघायला लागेल. कारण ठिकठिकाणचे व्हिडीओ बघितले होते. त्या व्हिडीओत डॉक्टर विमानतळावर लोकांचे कोरोना टेस्ट घेत होते. त्यामुळे सात ते आठ तास लोकं विमानतळावर बसली आहेत, लोकं चिडली आहेत, असं व्हिडीओत दिसलं होतं. पण, खरं चित्र वेगळं होतं.

काल मुंबईत आमचं विमान लँड झालं. विमानतळावर अत्यंत जलद गतीने सर्वांची कोरोनाची टेस्ट घेतली गेली. विशेष म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की, टेस्ट घेणारे वैद्यकीय विद्यार्थी किंवा तरुण डॉक्टर होते. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करत होते. त्यांना सगळ्यात आधी धन्यवाद म्हणायचं आहे.

विमानतळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. कारण अप्रतिम पद्धतीने काम सुरु होतं. पोलीस खाते, आर्मीतील जवान यांच्या मदतीने सर्व काम सुरळीत चालू होतं. त्यांना मला धन्यवाद म्हणायचं आहे. महाराष्ट्रात कोरोना होऊ नये यासाठी उत्तम उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही अमेरिकेत आल्यामुळे हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का बसलेला आहे”, असं अमेय वाघ म्हणाला.

हेही वाचा : कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *