
मनोरंजन सृष्टीतले हीमॅन आणि सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या जाण्याने सर्वच शोकाकुल आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी राहत्या घरी, मुंबईत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते आता नसले तरीही त्यांच्या अनेक आठवणी, चित्रपट, गाण्याच्या रुपाने आपल्यात आहेत. त्यांनी काम केलेला शेवटचा चित्रपट आता लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. त्यातच धर्मेंद्र यांचा एका शेवटचा व्हिडीओही समोर आला असून तेपाहून लोकं भावूक झाले आहेत. धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा, अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) यानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘इक्किस’ हा धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या चित्रपटात त्यांनी सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता, बॉबी देओलने चित्रपटातील त्याच्या वडिलांचा, एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना दिसतात.
बॉबीने शेअर केली वडिलांची ती क्लिप
बॉबी देओल याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे वडील, अभिनेते धर्मेंद्र हे इक्कीस चित्रपटाच्या सेटवर दिसतात. हा चित्रपटाचा रॅप अप व्हिडिओ आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “या चित्रपटाचा भाग होऊन मी खूप आनंदी आहे. संपूर्ण टीम आणि कॅप्टन श्रीरामजींसोबत काम करण्याचा आनंद झाला. चित्रपटाचे चित्रीकरण खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झाले.” असं त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, ‘ मला वाटतं भारत आणि पाकिस्तान, दोन्हीकडच्या लोकांनी हा चित्रपट पाहावा. मी आनंदी आहे आणि थोडा दुःखीही आहे, कारण आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी माफी मागतो.” असंही त्यांनी त्यात नमूद केलं आहे. बॉबी देओलने हा व्हिडिओ शेअर केला. “लव्ह यू, पापा.” अशी खास कॅप्शनही त्याने लिहीली.
कधी रिलीज होणार चित्रपट ?
‘इक्कीस’ हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. खरतर हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु त्याच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ मुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलली. हा चित्रपट 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असून, त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने 21 वर्षीय शूर आणि टँक मास्टर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटात जयदीप अहलावत आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे आणि त्याचे बहुतांश चित्रीकरण गावात झाले आहे. ट्रेलरमध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या “पिंड अपने नु जवान” या कवितेचे सुंदर चित्रीकरण देखील दाखवण्यात आले आहे.