फक्त 6 महिनेच जगू शकतोस..; डॉक्टरांनी इशारा देताच अदनान सामीने असं कमी केलं 120 किलो वजन
अदनान सामी गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. तू फक्त सहा महिनेच जगू शकतोस, असा इशारा डॉक्टरांनी त्याला दिला होता.

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या दमदार गायनकौशल्यासोबतच ट्रान्सफॉर्मेशनसाठीही ओळखला जातो. अदनानने वजन कमी करून सर्वांनाच थक्क केलं होतं. या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात कोणत्या सोप्या निर्णयाने नाही तर एका भयानक इशाऱ्याने झाली होती. एक वेळ अशी होती, जेव्हा डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की, त्याचं वाढत चाललेलं वजन जीवघेणं असून त्याच्याकडे फक्त सहा महिनेच शिल्लक आहेत. डॉक्टरांचा हा इशारा आणि वडिलांच्या डोळ्यांमधील भीती यांमुळे अदनान पूर्णपणे घाबरला होता. त्यावेळी त्याचं वजन तब्बल 230 किलोंवर होतं. यामुळे त्याला उठता-बसताही येत नव्हतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदनानने त्याचा हा संघर्ष सांगितला.
अदनान म्हणाला, “ही गोष्ट अधिक दु:खद आणि भीतीदायक यासाठी बनली होती, कारण जेव्हा डॉक्टरांनी मला असा इशारा दिला, तेव्हा माझे वडील माझ्या बाजूलाच बसले होते. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला अशा अवस्थेत पाहून पूर्णपणे खचून जाते. सुरुवातीला मी वडिलांचं टेन्शन कमी करण्यासाठी त्यांना सांगितलं की डॉक्टर उगाचच अतिशयोक्तीने सांगत असतील. पण त्यांनी हलक्यात घेतलं नाही. ते भावूक होत म्हणाले की, डॉक्टर काहीही बोलत नाहीयेत, जे ते पाहत आहेत तेच सत्य आहे. त्यांच्या डोळ्यांमधील असहाय्यता आणि अश्रू पाहून मी पूर्णपणे खचून गेलो होतो. मी त्यांना आश्वासन दिलं की, मी हे सर्व ठीक करीन. मी सगळं काही व्यवस्थित करीन. तिथूनच माझ्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यावेळी खरंतर मलाही कल्पना नव्हती की मी इतकं वजन कमी करू शकेन.”
View this post on Instagram
अदनानं वजन झपाट्याने कमी होऊ लागताच सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या होत्या की त्याने वजन करमी करण्यासाठी शस्त्रक्रिया (बॅरिएट्रिक सर्जरी) केली आहे. हे ऐकून आणि पाहून खूप दु:ख झाल्याचं अदनानने सांगितलं. सर्जरीचे दावे फेटाळत तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही कठोर परिश्रमाने काहीतरी मिळवता, तेव्हा काही लोक तुमच्या प्रयत्नांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. माझ्या सर्जरीच्या बातम्या पूर्णपणे मूर्खपणाच्या होत्या. मी कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. हे सर्व मी कडक डाएट, व्यायाम आणि शिस्तबद्ध लाइफस्टाइलच्या जोरावर केलं आहे. कोणत्याही सर्जरीशिवाय मी जवळपास 120 किलो वजन कमी केलं होतं. माझ्यासाठी हा जगण्या-मरण्याचा प्रश्न होता.”
