अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’नंतर हा मोठा चित्रपटही गमावला? खरंच ‘धुरंधर’च्या यशाची हवा गेली डोक्यात?
'धुरंधर' या चित्रपटानंतर अक्षय खन्ना कोणत्या चित्रपटात भूमिका साकारणार, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अशातच 'दृश्यम 3'ची चर्चा होती. परंतु अक्षयने ऐनवेळी त्यातून काढता पाय घेतला. त्यानंतर आता आणखी एक मोठा चित्रपट त्याने गमावल्याचं कळतंय.

‘धुरंधर’ या चित्रपटानंतर सर्वत्र अभिनेता अक्षय खन्नाची वाहवा होऊ लागली आहे. या चित्रपटात त्याने साकारलेली रेहमान डकैतची भूमिका आणि FA9LA गाण्यावरील त्याचा डान्स पाहून प्रेक्षक अक्षरश: त्याच्या प्रेमात पडले आहेत. भूमिका खलनायकाची असूनही अक्षयने त्यातून आपली विशेष छाप सोडली आहे. सोशल मीडियावर अजूनही अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये आहे. इन्स्टाग्राम सुरू करताच अक्षय खन्नाच्या गाण्यावरून पाच ते सहा रील्स धडाधड दिसून येतात. आता ‘धुरंधर’नंतर तो कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सुरुवातीला ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. परंतु निर्मात्यांसोबत काही मतभेद झाल्याने अक्षयने या प्रोजेक्टमधून ऐनवेळी माघार घेतली.
आधी ‘दृश्यम 3’ गमावला
‘दृश्यम 3’च्या निर्मात्यांसमोर अक्षयने ऐनवेळी काही अटी-शर्थी ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्यास निर्मात्यांनी नकार दिल्यानंतर त्याने काढता पाय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे निर्मात्यांनी त्याच्यावर बरीच टीका केली होती. इतकंच नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. याच कारणामुळे आता अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’मध्ये दिसणार नाही. अशातच आता आणखी एक मोठा चित्रपटातून त्याच्या हातातून निसटल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आता ‘रेस’च्या फ्रँचाइजीमधून बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय ‘रेस’ या चित्रपटाच्या फ्रँचाइजीमधूनही बाहेर पडल्याचं समजतंय. ‘रेस 4’ या चित्रपटाबद्दल सध्या चर्चा सुरू असून यामध्ये सैफ अली खान आणि अक्षय खन्ना झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता असं होणार नसल्याचं कळतंय. निर्माते रमेश तौरानी यांनी ‘एचटी सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आम्ही अक्षय खन्नाशी संपर्क साधला नाही. कारण त्याच्या भूमिकेला पुढे काही वाव नाही.” ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षयला पुन्हा ‘रेस’च्या फ्रँचाइजीमध्ये घेण्याचा काही विचार आहे का, असा प्रश्न त्यांना पुढे विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अक्षयला या चित्रपटात परत घेण्याचा काही विचार केला नाही. कारण याआधीच्या भागात त्याच्या भूमिकेचा अपघात होतो आणि ती कथा तिथेच संपते.”
निर्मात्यांनी ‘रेस 4’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि सैफ अली खान यांच्या भूमिका निश्चित झाल्याच्या चर्चांनाही फेटाळून लावलं. अद्याप कोणत्याच कलाकाराबद्दल निर्णय घेण्यात आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या ‘रेस 4’च्या पटकथेवर काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘रेस’च्या फ्रँचाइजीमधील कास्टची बरीच चर्चा होती. दुसऱ्या भागात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला होता.
