बाळासाहेब ठाकरे यांचा ‘हा’ नातू बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत; राजकारणाची नाही तर ग्लॅमरची भुरळ
बाळासाहेब ठाकरे यांचा एक नातू राजकारणाऐवजी लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केल्यानंतर आता तो अनुराग कश्यपच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील एक सदस्य लवकरच ग्लॅमरच्या जगात प्रवेश करणार आहे.

राजकारण म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांनी घालून दिलेला पायंडा आजपर्यंत ठाकरे कुटुंबातील सर्वचजण, तसेच त्यांचे कार्यकर्तेही पाळत आहेत. पण ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने राजकाराणाचा मार्ग सोडून चक्क चित्रपटसृष्टीचा मार्ग धरला आहे. ग्लॅमर दुनियेनं नक्कीच त्याला आकर्षित केलं आहे. चित्रपटसृष्टीची भुरळ घातलेला बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणजे ऐश्वर्य ठाकरे. ऐश्वर्य ठाकरे लवकरच चित्रपटातून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये
शिवसेनेचे संस्थापक अन् सर्वांचे आदर्श नेते बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आता राजकीय नव्हे, तर कलात्मक वाटेवर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐश्वर्यला त्याच्या या निवडीसाठी त्याच्या कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या पार्श्वभूमीमुळे राजकारणात प्रवेश अपेक्षित असताना, ऐश्वर्यनं वेगळा मार्ग निवडल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
डान्स आणि मायकेल जॅक्सनच्या स्टाइलचा प्रभाव
ऐश्वर्यला लहानपणापासूनच चित्रकलेची, सिनेमा आणि नृत्याची ओढ होती, ज्यातून त्यानं आपल्या करिअरची दिशा ठरवली आणि राजकीय वारशाऐवजी कलात्मक क्षेत्राची निवड केली. 2015 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐश्वर्यनं सुरुवात केली. सेटवरील अनुभव, शिस्त आणि सर्जनशीलतेनं त्यानं चित्रपटसृष्टीची खरी ओळख मिळवली. ऐश्वर्य हा उत्कृष्ट नृत्यकलेसाठी देखील ओळखला जातो. त्याच्यावर मायकेल जॅक्सनच्या स्टाइलचा प्रभाव आहे. त्याची लयबद्धता आणि आत्मविश्वास अनेकांना भावलाय. केवळ अभिनयच नव्हे, तर नृत्यातही त्याची मेहनत दिसते.
View this post on Instagram
ऐश्वर्यचा आपल्या कामातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण करण्याचा निर्णय ऐश्वर्यनं घेतला असून हा प्रकल्प केवळ ग्लॅमरसाठी नसून अभिनय कौशल्यवर भर देणारा आहे. ठाकरे आडनाव ही त्याची ओळख असली तरी, ऐश्वर्य वाटचाल ही पूर्णपणे वेगळ्या वाटेवर आधारलेली आहे. कोणतेही मोठे प्रमोशन्स किंवा मार्केटिंग न करता, तो आपल्या कामातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऐश्वर्यनं पदार्पणीय चित्रपटाबाबत गोपनीयता बाळगली
ऐश्वर्य ठाकरेनं त्याच्या पदार्पणीय चित्रपटाबाबत गोपनीयता बाळगलेली आहे. अद्याप तरी तो कोणत्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे याबबात त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. पण एवढं नक्की ऐश्वर्य ठाकरे जेव्हाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल तेव्हा सर्वांसाठी तो एक कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा क्षण असेल. ऐश्वर्यचा अभिनय पाहायाल नक्कीच सर्व प्रेक्षकांना आवडेल.
