Ajay Devgn : Drishyam 3 सोबत होणार ‘डबल धमाका’, चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज ?
Ajay Devgn Double Surprise : गांधी जयंतीला अजय देवगणच्या चाहत्यांना 'डबल सरप्राईज' मिळणार आहे. 2 ऑक्टोबरला बहुप्रतीक्षित 'दृश्यम 3' प्रदर्शित होत असून, त्याचसोबत अजयच्या आगामी चित्रपटाची पहिली झलकही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळू शकते. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Ajay Devgn Double Surprise : यावर्षीच्या सुरूवातीपासूनच आत्तापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे सीक्वेल रीलिज झाले असून सिनेप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली. याचदरम्यान आता अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. यंदाची गांधी जयंती अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खूप खास ठरणार असल्याची चर्चा आहे. कारण एकीकडे अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर दुसरीकडे याच चित्रपटासोबत अजयच्या आगामी‘रेंजर’ची पहिली झलकही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हे डबल सरप्राईज ठरू शकतं. गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणच्या ‘रेंजर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, ‘रेंजर’चा टीझर 2 ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’च्या शोदरम्यान थिएटरमध्ये दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका तिकिटात अजयच्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सची झलक पाहायला मिळू शकते. त्यामुळेच त्यांची उत्सुकता बरीच वाढली आहे.
अजयसोबत संजय दत्त आणि तमन्ना भाटिया
‘रेंजर’ हा एक ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. जगन शक्ती हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात फक्त अजय देवगणच नव्हे तर त्याच्यासोबत संजय दत्त आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जर ‘दृश्यम 3’सोबत ‘रेंजर’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, तर अजयच्या चाहत्यांसाठी हा खरोखरच डबल धमाका ठरणार आहे. मोठ्या पडद्यावर ‘दृश्यम 3’चा थरार अनुभवतानाच थिएटरमध्ये अचानक ‘रेंजर’ची झलक पाहायला मिळणं, हा प्रेक्षकांसाठी नक्कीच भन्नाट अनुभव ठरू शकतो.
कधी रिलीज होणार ‘रेंजर’ ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रेंजर’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, कदाचित रिलीज डेटमध्ये थोडाफार बदलही होऊ शकतो. हा चित्रपट पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा विचार मेकर्स करत असल्याचीही चर्चा आहे.’दृश्यम 3’सारख्या मोठ्या फ्रँचायझी चित्रपटासोबत ‘रेंजर’चा टीझर दाखवण्याची रणनीती मेकर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ‘दृश्यम 3’ पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येणार हे तर नक्की, आणि त्याचवेळी प्रेक्षकांपर्यंत ‘रेंजर’चा टीझर थेट पोहोचू शकतो. मात्र असं असलं तरीही सध्या ‘रेंजर’च्या टीझरबाबत मेकर्सकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
