इथे समंथाचं दुसरं लग्न, तिथे नाग चैतन्यने पोस्ट केला असा फोटो; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दुसरं लग्न करताच तिचा पूर्व पती आणि अभिनेता नाग चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नाग चैतन्यने ज्या वेळेला हा फोटो पोस्ट केला, त्यावरून नेटकरी खिल्ली उडवत आहेत.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. समंथाने 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात या दोघांनी ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’नुसार लग्न केलं. समंथाने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. एकीकडे समंथाच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा असतानाच दुसरीकडे तिचा पूर्व पती नाग चैतन्यने त्याच दिवशी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. नाग चैतन्यचा हा फोटो पाहून नेटकरी त्याला खूप ट्रोल करत आहेत. इतकंच नव्हे तर ‘समंथासारखा हिरा तू गमावलास’ असे कमेंट्स काही युजर्स करत आहेत.
समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. आता समंथानेही राजशी दुसरं लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. हे दोघं जरी आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी समंथा आणि नाग चैतन्यच्या जोडीचे चाहते आजही असंख्य आहेत. याच चाहत्यांनी आता नाग चैतन्यच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
नाग चैतन्यने त्याच्या ‘धूता’ या चित्रपटातील एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमधील त्याला लूक पाहण्यासारखा आहे. ‘धूता हा एक असा शो आहे, ज्याने हे सिद्ध केलंय की जर तुम्ही एक अभिनेता म्हणून सर्जनशीलता आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर निर्णय घेतले आणि तुमचं सर्वोत्तम दिलं तर लोक तुमच्याशी जोडले जातात. ती ऊर्जा लोक आत्मसात करतात आणि तुम्हाला ती परत देतात. धन्यवाद’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. धूताला दोन वर्षे झाल्यानिमित्ताने त्याने ही पोस्ट लिहिली होती. परंतु समंथाच्या लग्नाच्या दिवशीच त्याने स्वत:चा असा फोटो पोस्ट केल्याने नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
‘समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर नाग चैतन्यचा चेहराच पडला’, असं एकाने लिहिलं. तर ‘टायमिंग तर पहा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘योग्य वेळी पोस्ट केलास फोटो’, अशी उपरोधिक टीका आणखी एका नेटकऱ्याने केली.
