Dharmendra : ‘वीरू’च्या निधनाने पूर्णपणे खचले अमिताभ बच्चन; म्हणाले ‘इंडस्ट्री बदलली..’

तब्बल 50 वर्षांनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध जय-वीरूची जोडी तुटली आहे. दिग्गज अभिनेते धर्मंद्र यांचं सोमवारी निधन झालं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Dharmendra : वीरूच्या निधनाने पूर्णपणे खचले अमिताभ बच्चन; म्हणाले इंडस्ट्री बदलली..
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 11:33 AM

जेव्हा जेव्हा धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन एकाच मंचावर दिसले, तेव्हा लोकांना ‘जय-वीरू’च्या जोडीची आवर्जून आठवण आली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सर्वांत लोकप्रिय जोडी होती. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आता अमिताभ बच्चन एकटे पडले असले तरी ‘जय-वीरू’ या जोडीने चाहत्यांना ज्या खास आठवणी दिल्या, त्या आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आहेत. बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचं सोमवारी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांचा जिगरी दोस्त आणि छोटा भाऊ अमिताभ बच्चन हे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीवर पोहोचले होते. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सोमवारी मध्यरात्री बिग बींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली.

अमिताभ बच्चन नेहमीच एक्स (ट्विटर) अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात आणि तिथे आपल्या भावना व्यक्त करत असतात. आता वीरुच्या आठवणीत त्यांनी लिहिलं, ‘आणखी एक धाडसी आख्यायिका आपल्याला सोडून गेली आहे. एक असह्य शांतता मागे सोडून गेली आहे. धरमजी.. महानतेचे प्रतीक.. केवळ त्यांच्या प्रतिष्ठेसाठीच नाही तर त्यांच्या मनातील विशालता आणि अत्यंत प्रेमळ, साधेपणासाठी ते कायम लक्षात राहतील. पंजाबच्या गावच्या मातीतील सुगंध त्यांनी आपल्यासोबत आणला होता आणि त्या मातीशी ते कायम प्रामाणिक राहिले. ही इंडस्ट्री प्रत्येक दशकात बदलत होती, पण ते कधीच बदलले नव्हते. त्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचं हास्य, त्यांच्या स्वभावातील उब, त्यांचं आकर्षक सभोवतालच्या प्रत्येकापर्यंत पोहोचली. हे या इंडस्ट्रीत फार दुर्मिळ आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.’

अमिताभ बच्चन यांची पोस्ट-

अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. परंतु जय-वीरू या जोडीसाठीच दोघं खास ओळखले जातात. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांनी अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदासोबत काम केलंय. बिग आणि धर्मेंद्र हे केवळ चित्रपटांमध्येच नाही तर एकाच मंचावर आणि एकाच फ्रेममध्ये अनेकदा एकत्र दिसले.

सोशल मीडियावर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा एक जुना व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, “अमिताभ माझ्या धाकट्या भावासारखा आहे. तो अजूनही काम करत असल्याचं पाहून मला खूप आनंद होतो. देव त्याला दीर्घायुष्य देवो.” हे ऐकून बिग बी भावूक होतात. यावेळी मंचावर बिग बींसोबत त्यांची पत्नी जया बच्चन आणि धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनीसुद्धा उपस्थित होत्या.