अनंत अंबानी ते अनेक बडे सेलिब्रिटी त्याच्यापुढे मान झुकवतात, हा आहे हेअर स्टायलिस्ट सेलिब्रिटी
मुलाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो व्यवसाय पुढे नेला. आज त्याच व्यवसायामुळे लाखो, करोडोचा व्यवहार करणारे मोठ मोठे सेलिब्रिटी त्याच्यापुढे मान झुकवतात. अनेक दिग्दर्शक त्यांच्या तारखेनुसार चित्रपटांच्या तारखा ठरवतात. 15 मिनिटे बोलण्यासाठीही ते ठराविक रक्कम आकारतात.

मुंबई : बॉलीवूड आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटी त्यांच्या नवनवीन स्टाईलने दररोज चर्चेत असतात. मेकअपपासून ते त्यांच्या हेअरस्टाइलपर्यंत सर्वच बाबतीत त्यांचे चाहते वेडे होतात. अभिषेक बच्चन याने गेल्याच महिन्यात एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन त्याचे मुंडण करत आहेत. ज्युनियर बच्चनची मुंडण करणारा हकीम कैरनवी हे त्या फोटोमध्ये दिसत होते. हकीम कैरन यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र, आजही हे नाव प्रत्येक सेलिब्रिटी अगदी नवोदित सेलिब्रिटीलाही माहित आहे. याचे कारण, त्यांच्या मुलाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो व्यवसाय पुढे नेला. आज त्याच व्यवसायामुळे लाखो, करोडोचा व्यवहार करणारे मोठ मोठे सेलिब्रिटी त्याच्यापुढे मान झुकवतात.
अभिषेक बच्चन याचे मुंडन करणारे हकीम कैरनवी यांचे मुंबईतील भेंडी बाजार परिसरात प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट होते. त्यांची वेगळी स्टाईल पाहून अमिताभ बच्चन, सुनील दत्त, मेहमूद यांच्यासारखे कलाकार त्यांच्याकडे केस कापायला येत असत. मात्र, त्यांचे अल्पकाळात निधन झाले. त्यांचा मुलगा आलिम हा त्यावेळी अवघा 9 वर्षांचा होता. कुटुंबाला हातभार मिळावा यासाठी आलिम याने अवघ्या ९ व्या वर्षी हातामध्ये कैची, वस्तरा घेतला. त्याने स्वत: केस कापण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला आलिम आपल्या घरीच केस कापत असे. त्यासाठी तो ग्राहकांकडून केस कापण्यासाठी 20 रुपये घेत असे. मात्र हा व्यवसाय करतानाच आपला अभ्यासही त्याने सुरू ठेवला होता. आलिम याने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कॉलेजमधील त्याचे मित त्याला हजाम, न्हावी म्हणून हेटाळणी करत. मात्र, त्याचा आपल्या कामावर पूर्ण विश्वास होता. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने मुंबईतील ताज हॉटेलमधील मॅडम जॅक सलूनमध्ये केशभूषाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
मॅडम जॅक याच सलूनने आलिम याची खरी ओळख करून दिली. त्याच्या कामाला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्याने भेंडी बाजार परिसरातच स्वतःचे मोठे सलून उघडले. कालांतराने, आलिम याला पॅरिस, ऑस्ट्रिया यासारख्या देशातून हेअर स्टाइल शिकण्यासाठी ऑफर मिळू लागल्या. हेअर स्टाइलिंगमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या सेलिब्रिटींची हेअर स्टाईलसाठी रांग लागू लागली.
अनेक मोठमोठे सेलेब्रेटी त्याच्याकडे येऊन नवनवीन हेअर स्टाईल करू लागले. त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. यातूनच रजनीकांत, संजय दत्त, सुनील शेट्टी, सलमान खान, रणवीर सिंग, हृतिक रोशन, कतरिना कैफ, जूनियर एनटीआर, महेश बाबू, यश, राम चरण, विजय देवरकोंडा या सारख्या अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा तो हेअर स्टायलिस्ट बनला.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची नवीन सुपर कूल हेअरस्टाईल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा लूकही त्यांना आलीम हकीम यांनीच दिला आहे. आलिम याच्या क्लायंटच्या यादीत धोनी आणि विराटशिवाय अनेक बड्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांचा व्यवसाय आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
अनेक दिग्दर्शक त्यांच्या तारखेनुसार चित्रपटांच्या तारखा ठरवतात. 15 मिनिटे बोलण्यासाठीही आलीम हकिम हे ठराविक रक्कम आकारतात. आलीम हकीम सामान्य ग्राहकांचे केस कापत नाहीत. यासाठी त्यांची मोठी टीम आहे. बहुतेक वेळा ते चित्रपटांमधील कलाकारांच्या लूकवर काम करतान दिसतात. त्यासाठी ते अतिरिक्त फी देखील आकारतात.
