अश्लील चित्रपटांवर बंदी घाला, अनिरुद्धाचार्य भडकले, अमिताभ, रणवीरवरही गंभीर आरोप; काय म्हणाले?
प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांनी बॉलिवूडवर सडकून टीका केली आहे. बॉलिवूड चित्रपट भारतीय संस्कृतीचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी बॉलिवूडवर सडकून टीका केली आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना अनिरुद्धाचार्य यांनी बॉलिवूडची तुलना ‘ब्रिटिश राजवटीसोबत केली आहे. बॉलिवूड चित्रपट भारतीय संस्कृतीचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी रणवीर सिंग आणि अमिताभ बच्चन यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
बॉलिवूडने देशाला उद्ध्वस्त केले
अनिरुद्धाचार्य यांनी बॉलिवूडवर गंभीर आरोप केला आहे. चित्रपटांमध्ये सुना आणि मुलींना अशा कपड्यांमध्ये दाखवले जात आहे, जे समाजासाठी चांगले नाही. याचा मुलींवर वाईट परिणाम होत आहे. आता समाजातील अनेक मुली असे कपडे घालण्याचा हट्ट करत आहेत. हे केवळ महिलांबद्दल नाही, तर पुरुषांनीही नग्नता पसरवण्याचे काम केले आहे. आपल्या संस्कृतीत केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनीही चांगले कपडे घालने गरजेचे आहे.
अभिनेता रणवीर सिंग बाबत बोलताना ते म्हणाले की, ‘एका सुसंस्कृत समाजात, इतका पैसा असलेला, स्टार असलेला, इतकी प्रसिद्धी असलेला माणूस नग्न फोटो काढतो, हे सुसंस्कृत समाजासाठी योग्य नाही. समाजातील लोकांनी तो नग्न होतो यासाठी निषेध करायला हवा. मी ही नग्नता समाजासमोर आणली. मी नग्नतेचा निषेध केला तेव्हा बाकीचे लोक आता पुढे आले असून यावर भाष्य करत आहेत’
अमिताभ बच्चन यांनी दिशाभूल केली
अनिरुद्धाचार्य यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘अमिताभ बच्चन यांनी एक गाणे गायले की जर जगणे आवश्यक असेल तर मद्यपान करणेही आवश्यक आहे. माना जी कसूर हुआ… मैं नशे में चूर हुआ. मुझको होश में न लाना… असं बच्चन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बच्चन साहेब बालपणापासूनच त्यांच्या मुलाला चमच्याने दारू पाजत असतील.’
पुढे बोलताना अनिरुद्धाचार्य म्हणाले की, लोकांना वाटते बच्चन साहेब दारू पितात तर आपण का पिऊ नये. अनेकजण म्हणतील बच्चन साहेब इतके मोठे सुपर स्टार आहेत, संपूर्ण जग त्यांचे अनुसरण करते, ते मद्यपान करू शकतात मग तेव्हा आपण का करु नये? बच्चन यांचे चित्रपट पाहून समाज दारू पिऊ लागला तर बच्चन त्याला जबाबदार आहेत की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अश्लीलता असणाऱ्या चित्रपटांवर बंदी घाला
अनिरुद्धाचार्य पुढे बोलताना म्हणाले की, ‘अश्लीलता दाखवणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालावी. आता तुम्ही एक गाणे ऐकले असेल… ब्लू है पानी पानी. महिलांना तिथे अर्धनग्न उभे केले आहे. लहान मुलांनी ते पाहिल्यास काय शिकवण मिळेल? ज्या महिलांना आपण मर्यादेत राहायला शिकवले आहे, त्या अर्धनग्न फिरत असतील तर ते योग्य नाही. कारण आपण एका सुसंस्कृत समाजात राहतो.’
