2 तास 24 मिनिटांचा चित्रपट, क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप! असा ट्विस्ट की तुमचंही डोकं चक्रावेल
हा सस्पेन्स क्राइम थ्रिलर तुम्हाला पहिल्या दृश्यापासून थक्क करेल. त्याचा क्लायमॅक्ससुद्धा थरकाप उडवणारा आहे. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यापैकी काही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. जर तुम्हाला सस्पेन्स क्राइम थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर सध्या असाच एक चित्रपट त्याच्या दमदार कथेमुळे चर्चेत आला आहे. खरंतर हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ओटीटीवर येताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ओटीटीवर हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये होता. विशेष म्हणजे कोणत्याही वायफळ ड्रामाशिवाय हा चित्रपट क्राइमच्या एका कटू सत्याला दर्शवितो, जे पाहून कोणाचाही थरकाप उडेल. या चित्रपटाचं नाव आहे ‘अंजाम पतिरा’.
2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आयएमडीबीवर 7.9 रेटिंग मिळाली आहे. हा सस्पेन्स क्राइम थ्रिलर 2 तास 24 मिनिटांचा आहे. याची कथा इतकी दमदार आहे की तुम्हाला पूर्णवेळ खिळवून ठेवेल. हा जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चर्चेत आला आहे. हा चित्रपट पाहण्यास सुरुवात केली, तर तुम्ही अजिबात जागेवरून उठू शकणार नाही, कारण त्यातील प्रत्येक सीन धमाकेदार आहे. या कथेतील काही भाग सत्य घटनांवर आधारित आहे. जसं की साइको सायमनची भूमिका 2017 च्या नंथनकोड हत्याकांडावर आधारित आहे. या घटनेत एका साइकोपॅथिक मुलाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकलं होतं. याशिवाय रिपर रवीची भूमिका 1980 च्या दशकाच्या अखेरीस केरळमधील एका कुख्यात सीरिअल किलर रिपन चंद्रनवर आधारित आहे.
या चित्रपटात अन्वर नावाच्या कन्सल्टिंग क्रिमिनोलॉजिस्टची कथा दाखवण्यात आली आहे, जो वेळोवेळी केरळ पोलिसांची मदत करतो. जेव्हा एकानंतर एक हत्येच्या घटना घडतात, तेव्हा गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी केरळ पोलीस त्याची मदत घेते. ‘अंजाम पतिरा’ हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीमध्ये ‘मिडनाइट मर्डर्स अँड पोलीस स्टोरी’ म्हणून डब करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 2020 मध्ये हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर मिधुन मॅन्युएल थॉमसने त्याच्या सीक्वेलची घोषणा केली. ‘अंजाम पतिरा’चं लेखन आणि दिग्दर्शन मिधुननेच केलंय. या चित्रपटात कुंचाको बोबन, शराफ यू धीन, श्रीनाथ भासी, उन्निमया प्रसाद, जिनू जोसेफ आणि अभिरामी राधाकृष्णन यांच्या भूमिका आहेत.
