दरवर्षी ती गौरीला घरी यायची, पण यावर्षी..; प्रिया मराठेसाठी अंकिता लोखंडेची पोस्ट
सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं प्रिया मराठेसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री प्रिया मराठेचं रविवारी 31 ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालं. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील सहकलाकार आणि जिवलग मैत्रीण प्रिया मराठेच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट न लिहिल्याने अभिनेत्री अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगनंतर अखेर तिने इन्स्टाग्रामवर प्रियासाठी पोस्ट लिहिली आहे. अंकिताने प्रियासोबतचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात प्रिया अंकिताच्या घरी गौरी महाआरतीला आवर्जून उपस्थित असायची. परंतु यावर्षी ती नाही, या भावनेनं अंकिताचं मन भरून आलंय. आज ती आमच्यासोबत नाहीये, हे लिहितानाही प्रचंड दु:ख होत असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.
अंकिता लोखंडेची पोस्ट-
‘पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान झालेली प्रिया माझी पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया.. आमची छोटी गँग.. जेव्हा कधी आम्ही तिघी एकत्र असायचो, तेव्हा नेहमीच मनात समाधानाची भावना असायची. प्रिया, प्रार्थना आणि मी एकमेकींना ‘वेडे’ असं म्हणायचो आणि आमचं नातं खरंच खूप खास होतं. माझ्या चांगल्या दिवसांत ती सोबत होती आणि दु:खाच्या क्षणांत तिने मला सावरलं. मला जेव्हा कधी तिची गरज होती, तेव्हा ती मदतीला धावून यायची. गणेशोत्सव काळातील गौरी महाआरतीला ती कधीच गैरहजर राहिली नव्हती आणि यावर्षी.. मी तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करते वेडे.. तुझी खूप आठवण येईल’, असं तिने लिहिलंय.
View this post on Instagram
‘प्रिया खूप खंबीर होती आणि तिने प्रत्येक लढाई अत्यंत धाडसाने लढली होती. आज ती आमच्यासोबत नाहीये आणि हे लिहितानाही मला प्रचंड दु:ख होतंय. तिला गमावणं ही एक आठवण आहे की आपल्या हास्यामागे कोणी किती लढा देतोय हे आपल्याला कधीच कळत नाही. त्यामुळे नेहमी आत्मीयतेने वागा. प्रिया.. वेडे.. तू कायम माझ्या हृदयात आणि आठवणीत राहशील. प्रत्येक हास्यासाठी, प्रत्येक अश्रूसाठी आणि प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद. आपण पुन्हा भेटेपर्यंत.. ओम शांती’, अशा शब्दांत अंकिताने श्रद्धांजली वाहिली.
प्रिया मराठे, अंकिता लोखंडे आणि प्रार्थना बेहेरे या तिघींनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या तिघींनी ऑनस्क्रीन बहिणींची भूमिका साकारली होती. प्रिया मराठे गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती.
