गोरं दिसण्यासाठी अभिनेत्रींमध्ये ग्लुटाथियोनचं वेड; महिन्याला 4 इंजेक्शन्स घ्यायची ही हिरोइन
फिल्म किंवा टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार त्यांच्या लूकविषयी खूप सजग असतात. गोरं दिसणं, त्वचा चमकदार दिसणं यांसाठी ते विविध ब्युटी ट्रिटमेंट घेत असतात. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या घरातही पोलिसांना अशीच काही औषधं सापडली होती.

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अँटी एजिंग ट्रीटमेंट्र आणि ब्युटी करेक्शन सर्जरीबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. यामागचं कारण म्हणजे पोलिसांना शेफालीच्या घरात औषधांचे दोन बॉक्स आढळले. यामध्ये अँटी एजिंग आणि गोरं दिसण्यासाठीची औषधं होती. गेल्या काही वर्षांत ग्लुटाथियोनची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. यासंदर्भात अभिनेत्री रोझलिन खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ब्युटी ट्रिटमेंटविषयी खुलासा केला आहे. गोरं दिसण्यासाठी आणि त्वचा चमकण्यासाठी ती इंजेक्शन्स घ्यायची, असं रोझलिनने सांगितलं आहे.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत रोझलिन म्हणाली, “मी सुरुवातीला एका महिन्यात चार इंजेक्शन्स घ्यायची. म्हणजेच दर आठवड्याला एक इंजेक्शन. नंतर तुम्हाला तुमची त्वचा उजळ झाल्यासारखं वाटल्यावर तुम्ही त्याचा डोस कमीसुद्धा करू शकता. गोरी तर मी आतासुद्धा आहे, पण या इंजेक्शन्समुळे तुमच्या त्वचेला फेअरनेस प्लस एक ग्लो म्हणजे चमकसुद्धा येते. त्याचसोबत त्वचेचं आरोग्यसुद्धा जपलं जातं. मी सुरुवातीला चार इंजेक्शन्स घ्यायची. परंतु परिणाम चांगला दिसू लागल्यानंतर मी नंतर दोनच घेऊ लागली होती. कधी कधी मी महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन घ्यायची. त्याचीसुद्धा एक मर्यादा असते. तुमच्या शरीराला जितकं सहन होतं, तितकंच केलं पाहिजे.”
View this post on Instagram
शेफालीच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अद्याप समोर आला नाही. परंतु तिच्या घरात सौंदर्यासाठी इतकी औषधं आढळल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. ज्यादिवशी शेफालीचं निधन झालं, त्याच दिवशी तिच्या घरात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली होती. त्यामुळे ती दिवसभर उपाशी होती, अशीही चर्चा आहे. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर रात्री उशिरा शेफालीने फ्रीजमधील जेवण खाल्लं, आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडली, असाही अंदाज लावला जात आहे. तर दुसरीकडे अँटी एजिंगच्या या औषधांचाही काही परिणाम होऊ शकतो का, याविषयी नेटकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने अंबोली पोलिसांनी शेफालीच्या पतीसह 14 जणांचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालं असलं तरी मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
