गोविंदाच्या आयुष्यात उलथापालथ… अनुपम खेर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, तो स्वतः …
अभिनेता गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर चर्चा सुरू आहे. यावर अनुपम खेर यांनी भाष्य केलंय. काय म्हणाले ते ?

अभिनेता गोविंदा (Govinda) याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलच सध्या बरीच चर्चा होत आहे. त्याचे आणि पत्नी सुनीता मधील मतभेद, त्यांचे वाद, त्याची सहकलाकार कोमल रानी स्वर्णकार हिच्यासोबतचं नातं याबद्दलच सोशल मीडियावर उलट-सुलट अंदाज व्यक्त होत आहेत. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मात्र, त्यांच्या खासगी आयुष्यावर कोणताही निर्णय देण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अभिनेता अनुपम खेर हे 4 दशकांपेक्षा जास्त काळ या इंटस्ट्रीमध्ये काम करत आहेत. गोविंदासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी गोविंदाच्या खासगी आयुष्यात सुरू असलेल्या उलथापालथीवर मोकळेपणाने भाष्य केलं. कोणत्याही कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या कामावर परिणाम होता कामा नये, असं ते म्हणाले.
फरीदून शहरयार यांना दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी गोविंदाचं मनापासून कौतुक केलं. तसंच त्याला उत्कृष्ट अभिनेताही म्हटलं. मी गोविंदासोबत 10 ते 12 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच डान्स आणि इम्प्रोव्हायझेशनमध्येही गोविंदा याची बरोबरी करणं कठीण आहे, असं अनुपम खेर यांनी यावेळी नमूद केलं.
वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाले अनुपम खेर ?
मात्र गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील नात्याबाबत तसेच कथित अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. गोविंदा याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मी कोणताही निर्णय देऊ इच्छित नाही. गोविंदाला त्याचं स्वतःचं आयुष्य आणि परिस्थिती इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे समजते आणि या परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता त्याच्यात आहे, असं ते म्हणाले. अनुपम खेर यांनी पुढे सांगितलं की, एकदा त्यांनी गोविंदा याला फोनदेखील केला होता. त्या वेळी मला त्याला फक्त एकच गोष्ट सांगायची होती—“हा काळही निघून जाईल.” – असं ते म्हणाले
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला-वाईट काळ येतो
यावेळी बोलताना अनुपम खेर यांनी स्वतःच्या कारकिर्दीचाही दाखला दिला. ते गेल्या 41 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असून, या प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिल्याचं नमूद केलं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कालांतराने लोक त्याच्या चांगल्या कामाचीच आठवण ठेवतात, असं ते म्हणाले.
गोविंदाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असंही अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं. पण गोविंदा सध्या त्याच्या परिस्थिती आणि वैयक्तिक आयुष्यामुळे काहीसे अडचणीत सापडला आहे. असं असलं तरी त्याने अजून हार मानलेली नाही, त्यामुळे आशा कायम आहे, असं अनुपम खेर यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर गोविंदा याने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करावं आणि पूर्वीपेक्षा अधिक काम करावे, अशी इच्छा व्यक्त करत त्यासाठी मी प्रार्थना करतोय, असंही ते म्हणाले.
