पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला विसरले असते तर…’
Ashok Saraf: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केल्या...

Ashok Saraf: 27 मे रोजी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनय सम्राट अशोक सराफ यांना देखील राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर अशोक सराफ यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अशोक सराफ यांची चर्चा सुरु आहे. ‘अशा प्रकारे सन्मान होणं फार मोठी गोष्टी आहे… ही एक आनंदाची बाब आहे..’ असं अशोक सराफ म्हणाले.
‘हा पुरस्कार उच्चस्तरीय सन्मान आहे. त्यामुळे मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आलं. आयुष्यात नक्कीच काम केलं आहे…’ असं देखील सराफ म्हणाले. पुढे पुरस्कार मिळण्यास उशीर झाला, असं वाटतं का? असा प्रश्न देखील अशोक सराफ यांना विचारण्यात आला.
यावर अशोक सराफ म्हणाले, ‘उशीर झाला असं बिलकूल वाटत नाही. मला हा पुरस्कार मिळाला हिच माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला विसरले तर नाही ना? विसरले असते तर मी काही बोललो असतो. मला पुरस्कार देण्याचा त्यांनी विचार केला. मला माहिती नाही त्यांच्या कसं लक्षात आलं. पण पुरस्कार मला मिळाला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे…’
पुढे अशोक सराफ म्हणाले, ‘पद्म पुरस्काराचं एक वेगळं महत्त्व आहे. त्याचा मान राखायला हवा. आता जबाबदारी वाढली आहे आणि आता थांबून चालणार नाही… लोकांना आवडणार नाही असं काम न करणं फार महत्त्वाचं आहे. ज्यांनी या पुरस्कारासाठी मला पात्र ठरवलं त्यांचा मी शतशः आभारी आहे.’ असं देखील अशोक सराफ म्हणाले.
सांगायचं झालं तर, प्रसिद्ध दिवंगत गायिका शारदा सिन्हा, अशोक सराफ, रिकी ग्यान यांसारख्या अनेक दिग्गजांना पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात सन्मानित करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
