Awarapan 2: इमरान हाश्मीची जादू पुन्हा चालली; ‘आवारापन 2’ने बॉक्स ऑफिस हादरवलं, 2 दिवसांत तुफान कमाई
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2' हा अभिनेता इमरान हाश्मीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

अभिनेता इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी इमरान हाश्मीच्या करिअरमधील सर्वांत मोठ्या ओपनिंगची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही कमाईच मोठी वाढ पहायाला मिळाली. ‘कोईमोई’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘आवारापन 2’ने पहिल्या दिवशी भारतात तब्बल 23.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’ या पहिल्या भागाने संपूर्ण थिएट्रिकल रनमध्ये 7.75 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे सीक्वेलने फक्त एका दिवसात पहिल्या भागाच्या लाइफटाइम कलेक्शनपेक्षा तब्बल 201% अधिक कमाई केली आहे.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘आवारापन 2’च्या कमाईला आणखी वेग मिळाला. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी या चित्रपटाने जवळपास 33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे दोन दिवसांची एकूण कमाई 55 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शनिवारी सकाळच्या शोची ऑक्युपन्सी 31% होती. दुपारनंतर ही टक्केवारी 70 च्या पुढे पोहोचली होती. विशेष म्हणजे ‘आवारापन 2’ने इमरान हाश्मीच्या अनेक जुन्या हिट चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘बुक माय शो’वर शुक्रवारी आणि शनिवारी ‘आवारापन 2’चे दर तासाला 20 हजारहून अधिक तिकिटं विकली जात होती. शुक्रवारी या सीक्वेलला पहिल्या ‘आवारापन’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकण्यासाठी फक्त आठ तास लागले.
‘आवारापन 2’ने मोडले इमरान हाश्मीच्या जुन्या चित्रपटांचे रेकॉर्ड
- हक- 20 कोटी रुपये
- राज 2- 25.50 कोटी रुपये
- एक थी डायन- 26 कोटी रुपये
- जन्नत- 30 कोटी रुपये
‘आवारापन 2’च्या दमदार कमाईमागे इमरान हाश्मीची लोकप्रियता, पहिल्या भागानंतर सीक्वेलची क्रेझ आणि संगीत हे महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. आता रविवारच्या कमाईनंतर हा चित्रपट किती मोठा आकडा गाठतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी पुन्हा एकदा शिवम पंडितच्या भूमिकेत परतला आहे. या चित्रपटात शबाना आझमी, दिशा पटानी आणि सुविंदर विकी यांच्याही भूमिका आहेत. ‘आवारापन 2’ या चित्रपटाचा बजेट 45 कोटी रुपये असल्याचं कळतंय.
‘आवारापन 2’चे विक्रम
- इमरान हाश्मीच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा ओपनिंग देणारा चित्रपट
- बॉलिवूडमधील रोमँटिक जॉनरच्या चित्रपटासाठी सर्वांत मोठा ओपनिंग डे
- 2026 मधील तिसरी सर्वांत मोठी ओपनिंग
