OTT वर दोन वर्षांपूर्वीचा चित्रपट होतोय प्रचंड ट्रेंड, IMDb रेटिंग 5.8, पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
सध्या ओटीटीवर दोन वर्षांपूर्वीचा एक चित्रपट प्रचंड ट्रेंड होत आहे. या चित्रपटाला IMDb वर फक्त 5.8 रेटिंग मिळालं आहे. पण सध्या तो चर्चेत यामागचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर

ओटीटीच्या दुनियेत गेल्या तीन-चार दिवसांपासून एक मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक-दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक अॅक्शन-ड्रामाचित्रपट अचानक ट्रेंड करू लागला आहे. विशेष बाब म्हणजे, मूळ तेलुगू भाषेत तयार झालेल्या या चित्रपटाला IMDb वर केवळ 5.8 रेटिंग मिळालं असलं तरीही तो चित्रपट प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहात आहेत.
या चित्रपटात काजल अग्रवाल, ‘पुष्पा 2’ फेम श्रीलीला तर खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन रामपाल आहे. मुख्य भूमिकेत आहेत तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नंदमुरी बालकृष्ण. या चित्रपटाचं नाव आहे ‘भगवंत केसरी’. जो 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. सुमारे 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 84.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात 114.50 कोटी रुपयांची कमाई केली होती.
प्रसिद्ध तेलुगू लेखक-दिग्दर्शक अनिल रविपुडी यांचा ‘भगवंत केसरी’ 2023 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र चित्रपटाच्या थीम आणि संदेशाचं कौतुक झालं होतं. विशेष म्हणजे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तेलुगूमधील सर्वोत्तम फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तसेच तेलंगणा राज्य गद्दर पुरस्कारांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फीचर फिल्मचा सन्मानही या चित्रपटाला मिळाला.
अचानक ट्रेंड का होतोय ‘भगवंत केसरी’?
‘भगवंत केसरी’ पुन्हा चर्चेत येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तमिळ सुपरस्टार थलपती विजयचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’. राजकारणात पूर्णवेळ प्रवेश करण्यापूर्वी विजयचा हा शेवटचा चित्रपट असल्याचं मानलं जात आहे. हा चित्रपट शुक्रवार 9 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
बराच काळ चर्चा होती की ‘जन नायकन’ची कथा ‘भगवंत केसरी’पासून प्रेरित आहे. काही दिवसांपूर्वी ‘जन नायकन’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ही चर्चा आणखी वाढली. मात्र, ‘जन नायकन’चे दिग्दर्शक एच. विनोद यांनी कथा पूर्णपणे खरी असून कोणत्याही चित्रपटावर आधारित नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीही विजयचे चाहते हे मानायला तयार नाहीत. याच कारणामुळे ‘जन नायकन’च्या रिलीजआधी प्रेक्षक ‘भगवंत केसरी’ पाहण्यासाठी ओटीटीकडे वळत आहेत.
ओटीटीवर कुठे पाहता येईल?
नंदमुरी बालकृष्ण, श्रीलीला, काजल अग्रवाल आणि अर्जुन रामपाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भगवंत केसरी’ सध्या Prime Video आणि JioHotstar या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही पाहता येईल.
