कीटकांनी बंद पाडलं भरत जाधवचं नाटक, कल्याणच्या अत्रे नाट्य मंदिरात काय घडलं?
कीटकांमुळे भरत जाधव यांचं नाटक पडलं बंद, पण कसं... कल्याणच्या अत्रे नाट्य मंदिरात काय घडलं? सध्या सर्वत्र अत्रे नाट्य मंदिरात घडलेल्या घटनेची चर्चा...

अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे किंवा नैसर्गिक आपत्त्यांमुळे कार्यक्रम रद्द झाल्याचं ऐकलं असेल, पण चक्क कीटकांच्या उपद्रवामुळे नाट्यप्रयोग थांबवावा लागला, असं कधी ऐकलं आहे का? होय, हे खरं झालं आहे.कल्याणमधील महापालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात रविवारी सायंकाळी ज्येष्ठ नाट्यकलाकार भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग सुरू असताना, रंगमंचावरील दिव्यांच्या प्रखर झोतावर कीटकांचे थवेच्या थवे जमा झाले. यामुळे कलाकारांना सादरीकरण करणं अक्षरशः अशक्य झालं आणि नाटकाचा प्रयोग काही काळासाठी थांबवण्याची वेळ आली.
या अनपेक्षित अडथळ्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली, कारण नाटक रंगात आले असताना अचानक खंड पडला. नाट्यगृहाच्या देखभालीबाबत आणि नियमित फवारणीच्या आवश्यकतेबाबत यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सांगायचं झालं तर, रविवारी सायंकाळी कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एक विचित्र आणि अनपेक्षित अडथळा निर्माण झाला. प्रसिद्ध नाट्यकलाकार भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सायंकाळी साडेचार वाजता सुरू झाला. प्रेक्षक नाटकाचा मनसोक्त आस्वाद घेत होते, पण अचानक नाट्यगृहातील दिव्यांभोवती कीटकांचा वावर सुरू झाला.
सायंकाळी पाच वाजल्यापासून किरकोळ प्रमाणात कीटक रंगमंचावरील प्रखर झोताच्या दिव्यांवर घोंघावू लागले. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे कीटक मोठ्या थव्याने दिव्यांच्या दिशेने आले.
कीटकांच्या या वाढत्या उपद्रवामुळे नाट्य कलाकारांना रंगमंचावर आपली भूमिका सादर करणे अत्यंत अवघड झाले. शेवटी, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास, खुद्द भरत जाधव यांनी कीटकांचे प्रमाण कमी होईपर्यंत काही वेळ नाट्यप्रयोग बंद ठेवण्याची घोषणा केली.
प्रेक्षकांची नाराजी आणि व्यवस्थापकांचे स्पष्टीकरण:
नाटक रंगात आले असताना नाट्य प्रयोगामध्ये कीटकांच्या उपद्रवामुळे मध्येच खंड पडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. नाट्यरसिक शैलेंद्र सज्जे यांनी प्रतिक्रिया दिली की, “नाट्य सभागृह आणि रंगमंचावर वेळच्या वेळी फवारणी होणे खूप गरजेचे आहे, कारण कीटक घोंघावत असल्याने प्रयोग थांबवावा लागला.”अखेरीस, नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कीटकनाशक फवारणी केली.
या फवारणीनंतर कीटकांचा प्रभाव कमी झाला आणि त्यानंतर नाट्यप्रयोग पुन्हा सुरू होऊ शकला. आचार्य अत्रे नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी सांगितले की, नाट्य सभागृहात नियमित कीटकनाशक फवारणी केली जाते.या घटनेमुळे नाट्यगृहांच्या देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रेक्षकांना निर्विघ्नपणे कलाकृतींचा आस्वाद घेता यावा यासाठी नाट्यगृहांच्या स्वच्छतेची आणि कीटक नियंत्रणाची जबाबदारी अधिक गांभीर्याने घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
