घर सोडलं, अनफॉलो केलं..; ‘बिग बॉस’मधील लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप?
बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये झळकलेली प्रसिद्ध जोडी अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नव्हे तर प्रियांकाने अंकितचं घरसुद्धा सोडल्याचं म्हटलं जातंय.

‘बिग बॉस 16’ फेम अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी ही जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘उडारियाँ’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘बिग बॉस 16’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतल्यानंतर या दोघांमध्ये आणखी जवळीक निर्माण झाली. या दोघांनी कधी स्पष्ट कबुली दिली नसली तरी ते एकमेकांना डेट करत असल्याची खात्री चाहत्यांना होती. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. अंकित आणि प्रियांका नेहमी एकमेकांसोबत रोमँटिक वागताना दिसायचे. मात्र प्रेक्षकांची ही लोकप्रिय जोडी आता वेगळी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण अंकित आणि प्रियांकाने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
नेहमीच एकमेकांसोबत दिसणाऱ्या या जोडीमध्ये आता नेमकं काय बिनसलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. प्रियांका आणि अंकितने जरी एकमेकांना अनफॉलो केलं असलं तरी त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तसेच ठेवले आहेत. गेल्या वर्षी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र प्रियांकाने या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. “आम्ही दोघं फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. लग्नाच्या चर्चा कुठून पसरवल्या जात आहे, मला माहीत नाही”, असं ती म्हणाली होती.




View this post on Instagram
‘बिग बॉस 16’नंतर या जोडीला चाहत्यांनी ‘प्रियांकित’ असा टॅग दिला होता. हे दोघं एकाच घरात राहत असल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र आता प्रियांकाने ते घर सोडल्याची माहिती समोर येत आहे. या मुद्द्यावर दोघांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. होळीनिमित्त आयोजित पार्टीतही प्रियांका एकटीच दिसली. तिच्यासोबत अंकित कुठेच नव्हता. सहसा अंकित आणि प्रियांकाला प्रत्येक पार्ट्यांमध्ये एकत्रच पाहिलं जायचं. आता या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.