Bigg Boss 19 Grand Finale : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार तिसऱ्या क्रमांकावरच झाला बाद

Bigg Boss 19 Grand Finale : गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या तीन स्पर्धकांपैकी एक जण बाद झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे.

Bigg Boss 19 Grand Finale : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार तिसऱ्या क्रमांकावरच झाला बाद
Farhana Bhatt, Gaurav Khanna and Pranit More
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 07, 2025 | 10:46 PM

Bigg Boss 19 Grand Finale : ‘बिग बॉस 19’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्ही आणि जिओ प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल या टॉप 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली होती. त्यापैकी दोन स्पर्धकांना आधी घराबाहेर पडावं लागलं होतं. संगीतकार अमाल मलिक पाचव्या स्थानावर आणि त्यानंतर स्पिरिच्युअल इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल चौथ्या स्थानावर बाद झाली. त्यामुळे गौरव, फरहाना आणि प्रणित या तिघांपैकी कोण ट्रॉफी पटकावरण याची उत्सुकता ताणली होती. परंतु आता या तिघांपैकी एक जण बिग बॉसमधून बाहेर पडल्याचं कळतंय. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या स्पर्धकाचा बिग बॉसमधील प्रवास फिनालेमध्ये संपुष्टात आला. तिसऱ्या क्रमांकावर मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे बाद झाला आहे.

बिग बॉसच्या या सिझनमध्ये प्रणित मोरेनं आपली एक वेगळी ओळख बनवली होती. स्वच्छ व्यक्तीमत्त्व, उत्तर खेळ आणि कमाल विनोदबुद्धी यांच्या जोरावर प्रणितने टॉप 3 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. प्रणित या सिझनमधला सर्वांत लोकप्रिय आणि उत्तम खेळाडू ठरला. स्टँडअप कॉमेडियन, रेडिओ आरजे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या रुपात तो आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होता. परंतु ‘बिग बॉस 19’ने त्याला घरात आणि बाहेरसुद्धा एक वेगळं स्थान दिलं.

प्रणितने शालेय शिक्षणानंतर कॉमर्स शाखेत पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. त्याचवेळी त्याने कॅनव्हास लाफ क्लबच्या ओपन माइक स्पर्धेत भाग घेतला आणि ‘ओपन माइक मॅव्हरिक’ हा किताब जिंकला. 2013 ते 2015 पर्यंत प्रणितने एका कार शोरुममध्येही काम केलं होतं. परंतु त्याची आवड नेहमीच स्टँडअप कॉमेडीमध्ये होती. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर प्रणित अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने खेळ खेळून दाखवलं. पहिल्या दिवसापासूनच त्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरवली आणि चाहत्यांची मनं जिंकली. परंतु पुढील प्रवास त्याचा सुरळीत नव्हता. डेंग्युची लागण झाल्याने त्याला मधेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. तेव्हा अनेकांना वाटलं होतं की प्रणितचा प्रवास इथेच संपला. परंतु त्याने हार मानली नव्हती. पुन्हा घरात त्याच ऊर्जेनं परतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु आता ग्रँड फिनालेमध्ये पोहोचल्यानंतर तो तिसऱ्या स्थानी बाद झाला.