Bigg Boss 19 मध्ये मोठा ट्विस्ट; प्रीमिअरच्या आधी होणार अग्निपरीक्षा? स्पर्धक स्वत:च बनवणार नियम
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस 19' हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या नव्या सिझनमध्ये बरेच ट्विस्ट आणि सरप्राइज असतील. या शोच्या प्रीमिअरच्या एक दिवस आधी खास एपिसोड 'अग्निपरीक्षा' स्ट्रीम केली जाणार आहे.

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. या शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस 19’चा प्रीमिअर येत्या 24 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 23 ऑगस्टला प्रेक्षकांना खूप मोठा सरप्राइज मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी शो सुरू होण्याच्या एक दिवस आधी एक खास एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. ‘अग्निपरीक्षा’ असं या एपिसोडचं नाव असेल. विशेष म्हणजे हा एपिसोड टीव्हीवर नाही तर जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर दाखवण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच प्री-प्रीमिअर एपिसोड
‘टेलीचक्कर’च्या रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य प्रीमिअरच्या आधी एक वेगळा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. या एपिसोडमध्ये कदाचित प्रेक्षकांना नवीन स्पर्धकांची झलक, टास्क किंवा त्याहीपेक्षा नवीन ट्विस्ट दाखवण्यात येऊ शकतो. परंतु याविषयी शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. 31 जुलै रोजी सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’शी संबंधित पहिला प्रोमो समोर आला होता. यामध्ये त्यांनी या सिझनचा खास ट्विस्ट सांगितला होता.
बिग बॉसमध्ये घरच्यांचीच सरकार
प्रोमोच्या व्हिडीओमध्ये सलमान म्हणाला होता, ‘घरवालों की सरकार’. म्हणजेच या नव्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनाच काही मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. कोण बेघर होणार, कोण नॉमिनेट होणार.. या गोष्टी आता फक्त बिग बॉसच ठरवणार नाही, तर घरातील स्पर्धकांनाही त्याचा अधिकार असणार आहे. यामुळे खेळात आणखी ड्रामा आणि स्ट्रॅटेजी पहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ हा सर्वांत मोठा सिझन असू शकतो. यावेळी फक्त तीन महिन्यांचा नाही 5.5 महिन्यांचा शो असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सलमानचा करार फक्त 3 महिन्यांपुरताच
हा नवीन सिझन जरी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालू राहिला तरी अभिनेता सलमान खान संपूर्ण सिझन होस्ट करणार नसल्याचं समजतंय. तो फक्त पहिले तीन महिने शोमध्ये झळकू शकतो. त्यानंतर कोरिओग्राफर फराह खान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतात. सलमान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शेड्युलसाठी बांधिल असल्याने त्याने बिग बॉससाठी फक्त तीन महिन्यांचाच करार केला आहे. प्रत्येक सिझनप्रमाणेच यंदासुद्धा स्पर्धकांबद्दलची उत्सुकता कायम आहे. परंतु अद्याप अंतिम यादी जाहीर झालेली नाही.
