तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार; अखेर बॉबी देओलने सोडलं मौन
अभिनेता बॉबी देओलने एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता. शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्याने दिग्दर्शकांकडे तक्रार केली होती.

‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे अभिनेता बॉबी देओलच्या करिअरला मोठं वळण मिळालं. या चित्रपटातील अत्यंत क्रूर आणि नकारात्मक भूमिकेनंतर तो ‘लॉर्ड बॉबी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्या वेब सीरिज, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बॉबीचाच दबदबा पहायला मिळतोय. सध्या तो त्याच्या आगामी ‘बंदर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत बॉबी त्याच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत बॉबीला एका अभिनेत्रीसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तोंडातून दुर्गंधी येत असल्याने बॉबीने त्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता. त्यावर आता त्याने मौन सोडलं आहे.
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुप्त : द हिटन ट्रुथ’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी बॉबीसोबत हा प्रसंग घडला होता. यामध्ये बॉबीसोबत काजोल आणि मनिषा कोइराला यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘गुप्त’मधील ‘बेचैनिया’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना बॉबी अचानक अस्वस्थ झाला आणि त्याने थेट दिग्दर्शकाकडे तक्रार केली होती. या गाण्यातील एका इंटिमेट सीनदरम्यान बॉबीला मनिषाच्या तोंडातून येणारी तीव्र दुर्गंधी सहन होत नव्हती. अत्यंत क्लोज-अप शॉट असल्याने बॉबीला शूटिंग करणं कठीण झालं होतं. अखेर त्याने दिग्दर्शकांकडे जाऊन त्याची समस्या सांगितलं. याच प्रसंगावरून बॉबीला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाला बॉबी?
“मनिषा कोइरालाच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याने तू तिच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता, हे खरं आहे का”, असा सवाल बॉबीला विचारण्यात आला. तेव्हा तो प्रसंग आठवत बॉबी म्हणाला, “होय, मला आठवतंय. आम्ही शूटिंग करत असताना खूप थंडी होती आणि सेटवर कोणीतरी चना जोर गरम विकत होता. मनिषाने शूटिंगपूर्वी त्या चटपटीत पदार्थाचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर आमची शूटिंग सुरू झाली आणि आमचा संपूर्ण सीन शूट करायचा बाकी होता. या गाण्यात आमचा एक इंटिमेट सीन होता, जिथे मनिषाला माझ्या चेहऱ्याजवळ यायचं होतं. त्या सीनमध्ये माझ्या चेहऱ्यावर शून्य हावभाव होते, कारण तिच्या तोंडातून कांद्याचा वास येत होता. त्यामुळे मला व्यक्तच होता येत नव्हतं.”
या गोष्टीचा सूड कसा घ्यायचा, याचा विचार बॉबी करत होता. “त्यावेळी आणखी एका सीनचं शूटिंग होतं. कॉलेजमधल्या या सीनमध्ये मनिषाचा भाऊ का कोणीतरी मला मारायला आला होता. तो नवोदित अभिनेता होता, त्यामुळे मी त्याला असाच खोटा सल्ला दिला की शूटिंगपूर्वी कांदा खाल्ल्यास तुझा सीन आणखी चांगला होईल. मी त्याला खूप कांदे खायला लावले आणि त्यानंतर त्याला मनिषासोबत शूटिंग करायचं होतं. पण मनिषाला या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही. तिने कोणतीच तक्रार न करता शूटिंग पूर्ण केलं होतं. यावरून मला समजलं की त्या वयात आपण किती बालिश असतो”, असं त्याने पुढे सांगितलं.
या मुलाखतीत तो सलमान खानसोबतच्या कनेक्शनबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. “सलमान खान खूपच प्रेमळ आहे. त्याचं मन खूप मोठं आहे. तो सर्वांना खुश ठेवू इच्छितो. म्हणूनच माझे बाबा म्हणायचे की, हा अगदी माझ्यासारखाच आहे. दोघांमधील हा गुण एकसारखाच आहे. त्याने ऑफर केलेल्या रेस 3 या चित्रपटामुळे मला खूप फायदा झाला. जे लोक बॉबीला ओळखत नव्हते, ते या चित्रपटामुळे ओळखू लागले होते”, असं तो म्हणाला.
