
Nepal Gen Z protest: नेपाळ याठिकाणी सध्या वातावरण तापलं आहे. नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात हिंसक निषेध करण्यात आला. यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातील सोशल मीडिया बंदी विरोधात निषेध करण्यात आलं. आता हे आंदोलन हिंसेमध्ये बदललं आहे… प्रदीर्घ हिंसाचारानंतर सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे, परंतु त्यापूर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी देखील आहेत. नेपाळमध्ये हिंसा भडलेली असताना अभिनेत्री मनिषा कोईराला हिने फोटो पोस्ट करत नेपाळसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
मनिषा कोईराला हिने सोमवारी रात्री स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रक्ताने माखलेल्या एका बुटाचा फोटो पोस्ट केला. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘आज नेपाळसाठी काळा दिवस आहे. जेव्हा जनतेचा आवाज, भ्रष्टाचाराविरुद्ध नाराजी आणि न्यायाच्या मागणी केली तर त्यांना गोळ्यांनी उत्तर दिलं जात आहे.’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेपाळची असल्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.
सांगायचं झालं तर, नेपाळ सरकारने नुकताच, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णया विरोधात अनेक लोकं रस्त्यावर उतरले. विरोध करणाऱ्या लोकांमध्ये जेनरेशन झेड (Gen-Z) यांची संख्या अधिक आहे. कारण सोशल मीडियाचा वापर याच वयोगटातील लेकं अधिक करतात.
निषेधात सहभागी विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयीन गणवेश घालून रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःचे बॅनर आणि पोस्टर्स बनवले, घोषणाबाजी केली आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता निषेध केला. निषेध वाढत असताना, प्रथम अश्रूधुराचा वापर करण्यात आला, त्यानंतर निदर्शनाने हिंसक वळण घेतलं. यात 21 जणांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. नेपाळमधील हिंसाचाराचे काही धक्कादायक असे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.