Video : आंबेडकर रोडवर राहूनही ही गोष्ट माहीत नाही… मला लाज वाटायला पाहिजे…जान्हवी कपूर असं का म्हणाली?
जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाविषयी बोलताना दिसत आहे.

Janhvi Kapoor : बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलंय. सोशल मीडियावरही तिचे लाखोंनी चाहते आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने गांधी-आंबेडकर वाद आणि त्यांच्या विचारांवर केलेल्या विधानाची देशभरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण भारतातील जातीव्यवस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या जातीव्यवस्थेचे निर्मुलन या पुस्तकाबद्दल ती बोलताना दिसत आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर माझी विचार करण्याची पद्धत बदलल्याचं ती या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
मी आंबेडकर रोडवर राहते तरी…
जान्हवी कपूर एका मुलाखतीदरम्यान बोलत असताना तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीव्यवस्थेचे निर्मुलन या पुस्तकाचा उल्लेख केला. मी दिग्दर्शक नीरज घेवान यांच्यासोबत बराच वेळ घालवलेला आहे. यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं. त्यांनी नेमकं कोणत्या परिस्थितीला तोंड दिलं, ते कोणत्या समाजातून येतात, याबद्दल त्यांनी मला माहिती दिली. यामुळे मी विचार करायला लागले. मी समाजाचा एक घटक आहे. मी एक हिंदू आहे तरीही मला माझ्या समाजाबद्दल फार कमी माहिती आहे, याचा मी विचार करायला लागले. मी आंबेडकर रोडवर राहते. तरीदेखील मला या इतिहासाबद्दल फारच कमी माहिती आहे. मला लाज वाटायला पाहिजे, अशा भावना जान्हवी कपूर या व्हिडीओमध्ये व्यक्त करताना दिसते.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…
तसेच, मला या गोष्टी खटकल्या. त्यानंतर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीव्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक वाचले. मी काही व्हिडीओही पाहिले. तरीदेखील हे समजून घेण्याची प्रक्रिया सतत चालत राहणारी आहे, असं मला वाटतं, असं मतही तिने व्यक्त केलेलं या व्हिडीओमध्ये दिसतंय.
View this post on Instagram
देशाचा विकास करण्यासाठी तरुण…
तरुणांनी पुस्तकं वाचली पाहिजेत, सगळं समजून घेतलं पाहिजे, असं आवाहन तिने केलं. तुम्हाला तुमच्या समाजाविषयी माहिती असली पाहिजे. तुम्हाला जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवा. स्वत:ला शिक्षित करा. कारण समाजासाठी कोणतेही ठोस निर्णय घेण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी तरुण फार महत्त्वाचा घटक आहेत, असं मला वाटतं, असं जान्हवी तरुणांना उद्देशून म्हणाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.
हे पुस्तक वाचल्यानंतर मी…
मी अशी अचानक शिक्षिका का झाले, मला माहिती नाही. परंतु ते एक पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात बदल झाला. मी त्या पुस्तकामुळे खूप सारी बदलले. हे पुस्तक वाचल्यानंत आता मी ज्या भागात राहते, जे पुस्तक वाचते, जो चित्रपट पाहेत त्या प्रत्येक गोष्टीकडे मी वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकले आहे. या पुस्तकामुळे माझ्यात ती जागृती निर्माण झाली आहे, अशी माहितीही जान्हवीने दिली.
दरम्यान, जान्हवीच्या या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सामाजिक असमानतेविषयी तिला असलेली माहिती, या असमानतेबाबत तिचे असलेले विचार याचं कौतुक केलं जात आहे.
