Saiyami Kher : गावच्या मुलीसारखी दिसतेस, कॉस्मेटिक सर्जरी कर…; सैयामी खेरने सांगितला इंडस्ट्रीतील संघर्ष
अभिनेत्री सैयामी खेरने बॉलिवूडमध्ये 10 वर्षं पूर्ण केली आहेत. यानिमित्त तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. फिल्म इंडस्ट्रीतला इथपर्यंतचा प्रवास आणि चित्रपटसृष्टीत जागा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असताना तिला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, मागितलेले नसतानाही किती सल्ले ऐकावे लागले, हेही तिने उघड केलं. मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा नाशिकची एक शांत मुलगी होते, जिला चित्रपटसृष्टीबद्दल फारसं ज्ञान नव्हतं, असं ती म्हणाली. मी स्वत:ला सिद्धल करण्याआधीच अनेक लोकांनी मला जज केलं होतं, असंही सैयामीने सांगितलं.

सैयामी खेर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. मोठ्य़ा पडद्यावर तिने काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहे. तिला या इंडस्ट्रीमध्ये येऊन तब्बल 10 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने तिने जुन्या आठवणींना उजाळा देत, इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे नमूद केलं. तिला फिल्म इंडस्ट्रीबद्दल फार काही माहीत नव्हतं, लोकं तिला जज करायचे. पण सैयामीला स्वत:वर विश्वास होता. ” मी जेव्हा पहिल्यांदा फिल्म सेटवर पोहोचले, तेव्हा अवघी 20 वर्षांची होते. गेल्या 10 वर्षांत माझं आयुष्य मोठ्य़ा प्रमाणात बदलणारे असे बरेच अनुभव आलेत. त्यावेळी मी नाशिकची एक इंट्रोव्हर्ट तरूणी होते, जिला फिल्म इंडस्ट्रीची फारशी माहिती नव्हती. पण मी या इंडस्ट्रीसाठी योग्यच नाही, असं मानून मला सुरूवातीलचा नकार देण्यात आला, ” असा अनुभ सैयामीने सांगितला.
कॉस्मॅटिक सर्जरीचा सला
सैयामीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. ” मला अनेकदा सांगितलं जायचं की मी ‘गावच्या मुली’सारखी दिसते आणि अभिनेत्री बनण्याची माझी क्षमता नाही. एवढंच नाही तर इंडस्ट्रीत पुढे जाण्यासाठी, प्रगतीसाठी मला असे काही सल्ले देण्यात आले, जे ऐकणं माझ्यासाठी निश्चितच सोपं नव्हतं. काहींना मला सांगितलं की एखादा अभिनेता किंवा दिग्दर्शकाला डेट कर, त्यांच्या इंडस्ट्रीतील एंट्रीसाठी हा सोपा मार्ग आहे. त्याशिवाय मला कॉस्मॅटिक सर्जरी करण्याचा आण लिप जॉब करून घेण्याचाही सल्ला देण्यात आला” असं सैयामीने नमूद केलं.
” पण माझ्या आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे आणि आत्मविश्वासामुळे अशा गोष्टींनी मी खचले नाही. अनेकदा अशा गोष्टी ऐकून मला राग येण्याऐवजी त्यांची गंमतच वाटायची. माझ्या समोर असे अनेक लोक आले, ज्यांच्याकडे मला देण्यासाठी केवळ फुकटचे सल्ले होते. दुसरीकडे, मला दररोज रिजेक्शनचा सामना करावा लागत होता.” असं ती म्हणाली.
अशी मिळाली कलाटणी
सैयामी खेरच्या करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती एका फोन कॉलमुळे. “एका दिवशी अदूर मुखर्जी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की दिलीप शंकर माझी टेस्ट घेणार आहेत. माझ्यासाठी ही संधी इतर संधींपेक्षा खूप वेगळी होती.” असं तिने सांगितलं.
यानंतर सायामीने दिलीप शंकर आणि अभिनेता आदिल हुसेन यांच्यासोबत जवळपास तीन महिने वर्कशॉप केलं. या काळाने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. ती म्हणाली, “ हे तीन महिने माझं आयुष्य बदलणारे ठरले. या काळात मला स्वतःशी प्रामाणिक राहणं, माझ्या कामात प्रामाणिकपणा जपणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं शिकायला मिळालं.” या वर्कशॉपनंतर सुमारे सहा महिन्यांनी सैयामीची राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झ्या’ या चित्रपटासाठी निवड झाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हर्षवर्धन कपूरसोबत झळकली होती.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सायामीने तिच्या कारकिर्दीतील सर्वात खास अनुभवांपैकी एक असल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, “ राकेश सर अगदी त्या प्रकारचे व्यक्ती होते, ज्यांची मला त्या काळात गरज होती. त्यांनी मला एक कलाकार म्हणून मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी दिली आणि अभिनयावर प्रेम करायला शिकवलं. त्यांनी माझ्यावर आपल्या मुलीसारखं प्रेम केलं.” असं ती म्हणाली.
